नाशिक शहर पोलिस दलाला मोठे यश मिळाले आहे. पाच वर्षांपासून अपहृत आणि बेपत्ता असलेली नाबालिग मुलगी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने सुरक्षितपणे शोधून काढली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त मा. श्री संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अपहरण झालेल्या मुला–मुलींचा तसेच मिसिंग महिलांचा शोध घेण्यासाठी मध्यवर्ती गुन्हे शाखेकडे विशेष जबाबदारी देण्यात आली होती. पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली या मोहिमेला गती देण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांनी अपहृत व मिसिंग प्रकरणांचा सखोल आढावा घेत टीमला विशिष्ट दिशा दिली. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील अधिकारी आणि अंमलदारांनी सातत्याने समांतर तपास सुरू ठेवला.
सातपूर पोलिस ठाणे गुन्हा रजि. नं. 154/2021, भादंवि कलम 363 नुसार दाखल गुन्ह्यातील मुलगी मिळत नसल्याने शोधकार्य अवघड झाले होते. मात्र तांत्रिक विश्लेषणाद्वारे मुलगी जळगाव जिल्ह्यातील गिरड परिसरात असल्याची माहिती सपोनि प्रविण माळी यांना मिळाली.
29 नोव्हेंबर 2025 रोजी सपोनि माळी यांच्या नेतृत्वाखालील पथक—पोहवा गणेश वाघ, चापोहवा दीपक पाटील आणि मपोकॉ वैशाली घरटे—गिरड परिसरात रवाना झाले. मानवी कौशल्य, स्थानिक माहिती आणि तांत्रिक पुरावे यांच्या आधारे करण्यात आलेल्या तपासात अपहृत मुलगी आणि आरोपी किरण नामदेव जाधव (वय 27 वर्षे) हे दोघेही सापडले.
त्यांना ताब्यात घेऊन सातपूर पोलीस ठाण्याकडे पुढील तपासासाठी सुपूर्द करण्यात आले.
ही संयुक्त कारवाई पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) श्री किरणकुमार चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच डॉ. अंचल मुदगल आणि तांत्रिक विश्लेषण विभागाच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केली.