नाशिक मनपा निवडणूक: प्रभाग आरक्षणावरील सर्व हरकती फेटाळल्या; 2017 चीच प्रभागरचना कायम

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारीपूर्वी घेण्याचे निर्देश दिल्यानंतर नाशिक महापालिकेने निवडणूक प्रक्रिया वेगाने सुरू केली. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार काही दिवसांपूर्वी प्रभाग आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

या आरक्षणांवर हरकतींसाठी दिलेली मुदत संपली असून या काळात दोन हरकती प्राप्त झाल्या. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी या हरकतींचा सविस्तर तपास केल्यानंतर दोन्हीही हरकती फेटाळून लावल्या आहेत.

यामुळे 2017 प्रमाणेचीच प्रभागरचना कायम ठेवण्यात आली आहे.
एकूण 31 प्रभाग आणि 122 सदस्यसंख्या असलेल्या या रचनेत खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित केले गेले आहे:

  • सर्वसाधारण – 63
  • इतर मागास प्रवर्ग – 32
  • अनुसूचित जाती – 18
  • अनुसूचित जमाती – 9

मनपा उपायुक्त (प्रशासन) लक्ष्मीकांत साताळकर यांनी माहिती दिली की अंतिम प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगाला पाठविण्यात आली असून आज (दि. 3) ती राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

यामुळे नाशिक महापालिका निवडणुकीचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून जानेवारीच्या अखेरीस निवडणुका होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.