नाशिकमध्ये थंडीचा जोर वाढला, तीन दिवसांत तापमानात ४.३ अंशांची घसरण

नाशिक शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा थंडीने दमदार पुनरागमन केले आहे. आठवडाभर विश्रांती घेतल्यानंतर कडाका अचानक वाढू लागला असून गेल्या तीन दिवसांत किमान तापमानात ४.३ अंश सेल्सिअसची तीव्र घसरण नोंदली गेली आहे.

मंगळवार (दि. ९) सकाळी साडेआठच्या सुमारास तापमान ९.३ अंश सेल्सिअस होते, तर बुधवारी (दि. १०) ते आणखी कमी होऊन ८.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले.

उत्तर भारतातून सलग मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंझावाताच्या प्रभावामुळे थंडीची लाट महाराष्ट्रात झेपावत आहे. वातावरण थंडी वाढवण्यासाठी अत्यंत अनुकूल झाले आहे. त्यामुळे मुंबई आणि कोकण वगळता संपूर्ण राज्यात गारठा जाणवू लागला आहे.

मंगळवारी नाशिकमधील निफाड येथील गहू कृषी संशोधन केंद्रात या हंगामातील सर्वात नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, जे राज्यातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान ठरले.