नाशिक जिल्ह्यातील श्री त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षात ५० कोटी रुपये मंजूर करून ते जिल्हाधिकारी नाशिक यांना वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. नियोजन विभागाने याबाबतचा शासननिर्णय ९ डिसेंबर २०२५ रोजी जारी केला.
त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी २७५ कोटींचा विस्तृत आराखडा शासनाने पूर्वीच मंजूर केला होता. त्यानुसार या आर्थिक वर्षातील तरतुदीमधून ५० कोटी रुपये वितरण करण्यात आले असून हा निधी लेखाशीर्ष ५४५२ अंतर्गत तीर्थक्षेत्र विकास व पर्यटनाशी संबंधित भांडवली बांधकामांवर खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्रातील बहुसंख्य विकासकामे आगामी कुंभमेळ्याशी थेट संबंधीत असल्याने कामांचे योग्य नियोजन, वेळेत अंमलबजावणी आणि प्रभावी सनियंत्रण यासाठी संपूर्ण निधी थेट कुंभमेळा विकास प्राधिकरणाच्या खात्यात वर्ग करण्यात आला आहे. प्रत्यक्ष खर्च व महालेखापाल नोंदीतील खर्चातील तफावत दूर करून अचूक नोंद ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. वितरित निधीबाबतचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास तत्काळ पाठवणे बंधनकारक असेल.
या निधीतून करण्यात येणाऱ्या अनिवार्य कामांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:
– दर्शन पथांचे सुशोभीकरण
– पुरातन मंदिरे व कुंडांचे संवर्धन आणि दुरुस्ती
– शहरातील प्रमुख रस्त्यांचे नूतनीकरण
– वाहनतळांची उभारणी
– स्वच्छतागृहांची वाढ आणि सुधारणा
– अतिक्रमित पूजा साहित्य दुकानदारांचे पुनर्वसन
– घाट क्षेत्राचा विकास व सुदृढीकरण
– स्नानघाट व दर्शन मार्गांचे बांधकाम
कुंभमेळ्याच्या अनुषंगाने भाविकांसाठी वाढीव सुविधा उपलब्ध करण्यासाठी काही कामे तीर्थक्षेत्र विकास निधीतून करण्यास प्रशासनाने पूर्वीच मान्यता दिली होती. त्यानुसार तब्बल ३०० कोटी रुपयांच्या विकासकामांचा नव्या आराखड्यात समावेश करून शासनास सादर करण्यात आले होते.
निधी वितरणाचा सारांश:
– मंजूर मूळ आराखडा: २७५ कोटी रुपये
– चालू आर्थिक वर्षातील मंजुरी: ५० कोटी रुपये
– निधी वितरक: जिल्हाधिकारी, नाशिक
– निधीचा उपयोग: त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रातील मंजूर विकासकामे
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रात मूलभूत सुविधा, पर्यटक सेवेचा विकास आणि आगामी कुंभमेळ्याशी संबंधित प्रकल्पांना मोठी चालना मिळणार आहे.