बहुप्रतीक्षित पुणे–नाशिक रेल्वेमार्ग प्रकल्पाबाबत लोकसभेत मोठी घोषणा करण्यात आली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देताना सांगितले की, या प्रकल्पाचा अंतिम मार्ग आता ‘पुणे–अहिल्यानगर–शिर्डीमार्गे नाशिक’ असा निश्चित झाला आहे. अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला हा महत्त्वाचा प्रकल्प आता प्रत्यक्षात पुढे जाणार आहे.
मूळ आराखड्यानुसार रेल्वेमार्ग थेट पुणे–नाशिक असा ठरवण्यात आला होता. मात्र, जुन्नर तालुक्यातील खोडद येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (GMRT) वर या मार्गाचा परिणाम होण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले होते. GMRT हा जागतिक दर्जाचा संशोधन प्रकल्प असल्याने त्याचे संरक्षण करणे अत्यंत गरजेचे होते.
त्यामुळे जुन्नरमार्गे जाणारा पर्याय रद्द करून नवीन, सुरक्षित आणि अधिक उपयुक्त असा पुणे–अहिल्यानगर–शिर्डी–नाशिक मार्ग निवडण्यात आला. या नवीन मार्गामुळे प्रवाशांसह राज्यातील धार्मिक पर्यटन, औद्योगिक गुंतवणूक, वाहतूक आणि शैक्षणिक क्षेत्रांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. विशेषतः शिर्डीमार्गे नाशिकला जाणे अधिक सोयीस्कर होणार आहे.