महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत असून राज्यात थंडीचा कडाका वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण कमी झाले होते, मात्र आता वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊ लागली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. यामुळे गारठाही वाढला असून हवामान विभागाने शीतलऱीचा इशारा दिला आहे.
हवामान विभागाने भाकीत केले आहे की डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यात कडाक्याची थंडी वाढेल आणि किमान तापमानात लक्षणीय घसरण होईल. 3 ते 6 डिसेंबरदरम्यान कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दिवसा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. मात्र रात्री पुन्हा जोरदार थंडीची लाट जाणवू शकते.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे यंदा महाराष्ट्रात थंडी अधिक काळ टिकण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार हा थंडीचा जोर किमान दोन महिने टिकणार आहे.
उत्तर महाराष्ट्रातील तापमान एक अंकी पातळीवर जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस इतके नोंदवले जाऊ शकते.