नाशिक शहराला हृदयविकाराच्या आपत्कालीन परिस्थितीत अधिक सुरक्षित बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनच्या “मेकिंग नाशिक हार्ट सेफ, हार्ट स्ट्रॉंग” या उपक्रमांतर्गत त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात पाचवे ऑटोमेटेड एक्सटर्नल डिफिब्रिलेटर (AED) मशिन कार्यान्वित करण्यात आले आहे.
या जीवनरक्षक एईडी मशिनचे उद्घाटन कुंभमेळा आयुक्त श्री. शेखर सिंह यांच्या हस्ते करण्यात आले. हे मशिन विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशन आणि आरीस सॉफ्टवेअर सोल्यूशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने दान स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथे लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. अशा वेळी अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास तत्काळ उपचार मिळावेत यासाठी एईडीसारख्या उपकरणांची उपलब्धता अत्यंत आवश्यक आहे.
यावेळी प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विक्रांत विजन यांनी सांगितले की, “कुंभमेळ्याच्या काळात प्रचंड गर्दी असते. अशा ठिकाणी एईडी मशिन उपलब्ध असल्यास पहिल्या काही मिनिटांत योग्य उपचार मिळू शकतात आणि अनेकांचे प्राण वाचू शकतात.”
डॉ. सृष्टी विजन यांनी नमूद केले की, “हृदयविकाराचा झटका कुठेही आणि कधीही येऊ शकतो. अशा प्रसंगी तात्काळ डिफिब्रिलेशन मिळाल्यास जीवदान शक्य होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी एईडी बसवणे अत्यावश्यक आहे.”
दरम्यान, डॉ. विनोद विजन यांनी कुंभथॉन इनोव्हेशन फाउंडेशन आणि कुंभमेळा प्राधिकरणाच्या सहकार्याने आपत्कालीन स्थितीत ड्रोनद्वारे एईडी मशिन आणि वैद्यकीय मदत पोहोचवण्याचा नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू करण्यात आल्याची माहिती दिली.
विजन्स युनिक हेल्थकेअर फाउंडेशनतर्फे संपूर्ण नाशिक शहरात १०० एईडी मशिन बसवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून आतापर्यंत शाळा, महाविद्यालये आणि गृहनिर्माण संस्थांमध्ये हजारो नागरिकांना मोफत सीपीआर प्रशिक्षण देण्यात आले आहे.
दानशूर नागरिकांनी आणि संस्थांनी पुढाकार घेऊन नाशिकला देशातील पहिले “हार्ट सेफ सिटी” बनवावे, असे आवाहन फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.