नाशिक जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी आगामी ‘शाळा प्रवेशोत्सव’ अधिक आकर्षक, नियोजनबद्ध आणि परिणामकारक पद्धतीने आयोजित करण्याचे निर्देश राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. पालकांचा विश्वास जिंकणे आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री देणे ही सध्याची मोठी गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नाशिक जिल्हा परिषद येथे शिक्षण विभागाच्या जिल्हास्तरीय आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. सुभाष बोरसे, शिक्षण उपसंचालक संजय राठोड, DIET प्राचार्या रंजना लोहकरे, तसेच विविध शिक्षणाधिकारी आणि प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान शिक्षण व्यवस्थेचा सखोल आढावा घेत ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ प्रभावीपणे राबविण्यावर विशेष भर देण्यात आला. विद्यार्थ्यांच्या वाचन, लेखन आणि गणित कौशल्यांचा सातत्याने आढावा घेऊन आवश्यक त्या सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी दर आठवड्याला किमान एक दिवस शाळा भेटीसाठी राखून ठेवावा, असेही स्पष्ट करण्यात आले.