नाशिक महानगरपालिकेत आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. २८ रोजी अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली. आयुक्त व प्रशासक मनीषा खत्री तसेच अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी सर्व कर्मचाऱ्यांना समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या.
निवडणूक प्रक्रिया मुक्त, निष्पक्ष व शांततेच्या वातावरणात पार पडावी यासाठी आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नियमभंग करणाऱ्यांवर कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असा इशाराही प्रशासनाने दिला.
या बैठकीस उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर, आचारसंहिता कक्ष प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी शरद घोरपडे यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. तक्रार निवारण यंत्रणा, प्रचार साहित्य नियंत्रण, परवानगी प्रक्रिया व क्षेत्रीय स्तरावर प्रभावी देखरेख याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
नाशिक महानगरपालिका निवडणूक पारदर्शक व विश्वासार्ह व्हावी यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.