नाशिकमध्ये २२–२३ जानेवारीला भव्य ‘सूर्यकिरण’ एअर शो; नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक शहरात दि. २२ आणि २३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या भारतीय हवाई दलाच्या ‘सूर्यकिरण’ एअर शोचा नाशिककरांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. सोमवारी (दि. १९ जानेवारी) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, या एअर शोसाठी तिकीट दर माफक ठेवण्यात आले असून गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी तिकीट पद्धत राबविण्यात आली आहे. तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न ध्वज दिन निधीसाठी देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Ticket booking – surya-kiran-airshow.gogetastore.com

या एअर शोच्या माध्यमातून नाशिकची ओळख ‘डिफेन्स हब’ तसेच पर्यटननगरी म्हणून अधिक भक्कम करण्याचा प्रशासनाचा मानस आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसराला ‘सनसेट पॉइंट’ म्हणून ब्रँडिंग करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एअर शोसाठी एकूण ६० हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये २२ जानेवारी रोजी ३० हजार आणि २३ जानेवारी रोजी ३० हजार नागरिकांना प्रवेश दिला जाणार आहे. एअर शोची वेळ सकाळी १० ते दुपारी १२ अशी निश्चित करण्यात आली आहे.

नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था तसेच गर्दी नियंत्रणासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत १६ हजारांहून अधिक नागरिकांनी एअर शोसाठी तिकीट बुकिंग केल्याचेही त्यांनी सांगितले.

एअर शो पाहण्यासाठी येताना नागरिकांनी टोपी, छत्री, पिण्याचे पाणी तसेच उन्हापासून बचावासाठी आवश्यक साहित्य सोबत ठेवावे. तसेच पक्ष्यांना आकर्षित करणारे कोणतेही खाद्यपदार्थ कार्यक्रमस्थळी आणू नयेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

तीन हजार फोर-व्हीलर वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून, डीएसएलआर कॅमेरे आणण्यास परवानगी देण्यात आली आहे. सुरक्षेच्या दृष्टीने एनसीसीचे वरिष्ठ विद्यार्थी, माजी सैनिक, वाहतूक पोलीस तसेच पोलीस बंदोबस्त तैनात राहणार आहे.

एअर शोच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दुगाव फाटा आणि सावरगाव मार्गाचा वापर करता येईल, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे. नाशिककरांसाठी हा एअर शो एक अविस्मरणीय अनुभव ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.