नाशिकच्या अमृतधाम परिसरातील के. के. वाघ तंत्रनिकेतनतर्फे राज्यस्तरीय ‘प्र-ज्ञान’ विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन ११ आणि १२ डिसेंबरला करण्यात आले आहे. विद्यार्थी नवकल्पना, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि प्रयोगशीलता वाढविण्यासाठी हे प्रदर्शन दरवर्षी आयोजित केले जाते.
प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रादेशिक सहआयुक्त नितीन पवार आणि के. के. वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर वाघ उपस्थित राहणार आहेत. समारोप कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार व सहायक संचालक दीपक बिरारी उपस्थित रहाणार आहेत.
या प्रदर्शनात राज्याच्या विविध भागांतून तब्बल ७५० विद्यार्थी आणि अंदाजे २०० विज्ञान प्रकल्प सहभागी होणार आहेत. प्रत्येक प्रकल्पात चार विद्यार्थी सहभागी होऊ शकतात आणि प्रकल्प प्रतिकृती किंवा चलित मॉडेल स्वरूपात असणे अनिवार्य आहे. सर्व सहभागी विद्यार्थी, प्रकल्प मार्गदर्शक आणि संबंधित शाळांना प्रमाणपत्र प्रदान केले जाणार आहे.
प्रकल्प स्पर्धेसाठी आकर्षक बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली आहे—पहिला क्रमांक: १२,५०० रुपये, दुसरा क्रमांक: १०,००० रुपये, तिसरा क्रमांक: ७,५०० रुपये, चौथा क्रमांक: ५,००० रुपये आणि पाचवा क्रमांक: ४,००० रुपये. तसेच दीड हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येणार आहेत.
ही स्पर्धा ११ आणि १२ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत के.के. वाघ पॉलिटेक्निकच्या मैदानावर पार पडणार आहे.