नाशिकमध्ये ‘ऑपरेशन मुस्कान १४’ अंतर्गत मोठी कारवाई; ५४ बालकांची सुटका, बालकामगारांविरोधात गुन्हे दाखल

नाशिक शहरात बालकामगार व भिक्षा मागणाऱ्या मुलांविरोधात व्यापक मोहीम राबवत पोलिसांनी ‘ऑपरेशन मुस्कान १४’ अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. या विशेष मोहिमेच्या माध्यमातून अनेक अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या निर्देशानुसार तसेच पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध युनिट्स तसेच शहरातील सर्व पोलीस ठाण्यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवली. शहरातील हॉटेल, दुकाने, औद्योगिक आस्थापना तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी तपासणी मोहीम चालवण्यात आली.

या तपासादरम्यान काही आस्थापनांमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेत असल्याचे समोर आले. कमी मजुरीत जास्त काम करवून घेत त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केल्याचेही निदर्शनास आले. अशा सहा आस्थापनांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून, तेथून सात बालकामगारांची सुटका करण्यात आली.

याच मोहिमेचा भाग म्हणून शहरातील प्रमुख सिग्नल, बाजारपेठा आणि इतर सार्वजनिक ठिकाणी भिक्षा मागणाऱ्या ४७ बालकांचीही सुटका करण्यात आली. अशा प्रकारे एकूण ५४ मुलांना सुरक्षित ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी बाल कल्याण समितीसमोर सादर करण्यात आले.

बाल कल्याण समितीने तपासणी केल्यानंतर २७ मुलांना आधार आश्रमात ठेवण्याचे आदेश दिले, तर उर्वरित २७ मुलांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले. या कारवाईचा मुख्य उद्देश मुलांना शोषणाच्या वातावरणातून बाहेर काढून त्यांना सुरक्षित आणि शिक्षणासाठी पोषक वातावरण उपलब्ध करून देणे हा आहे.

ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त, विविध परिमंडळांचे पोलीस उपायुक्त तसेच गुन्हे शाखा आणि सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांच्या समन्वयातून यशस्वीरीत्या पार पडली. भविष्यातही अशा प्रकारच्या मोहिमा सातत्याने राबवून बालकामगार व बाल भिक्षावृत्तीवर नियंत्रण ठेवण्याचा पोलिसांचा निर्धार आहे.