नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून त्याच्या पुढील दिवशी म्हणजेच १६ जानेवारी रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी आणि मतदारांच्या सोयीसाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात आली आहे.
या निवडणुकीसाठी शहरभरात एकूण १,५६८ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर सरासरी ७०० ते ८०० मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रांची रचना पर्यावरणपूरक ठेवण्याचे निर्देश देण्यात आले असून बायोडिग्रेडेबल व पुनर्वापर करता येणाऱ्या साहित्याचा वापर करण्यात येणार आहे. तसेच सर्व मतदान केंद्रे प्लास्टिकमुक्त ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
अधिकाधिक मतदान केंद्रे ‘आदर्श मतदान केंद्र’ म्हणून विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. विशेष म्हणजे ज्या मतदान केंद्रांवर महिला मतदारांची संख्या जास्त आहे, त्या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व सुरक्षा कर्मचारी म्हणून महिलांची नियुक्ती केली जाणार आहे.
प्रभागनिहाय मतमोजणी केंद्रांची यादी :
- प्रभाग १ ते ३: मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल, पंचवटी
- प्रभाग ४ ते ६: मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडासंकुल, पंचवटी
- प्रभाग ७, १२, २४: दादासाहेब गायकवाड सभागृह, मुंबई नाका
- प्रभाग १३, १४, १५: वंदे मातरम् सभागृह, डीजीपी नगर क्रमांक १, नाशिकरोड
- प्रभाग १६, २३, ३०: दिव्यांग भवन, मुंबई नाका
- प्रभाग १७, १८, १९: शासकीय तंत्रनिकेतन, सामनगाव रोड, नाशिकरोड
- प्रभाग २०, २१, २२: नाशिकरोड विभागीय कार्यालय, दुर्गा गार्डन, नाशिकरोड
- प्रभाग २५, २६, २८: प्रबोधनकार ठाकरे सभागृह, अंबड पोलीस ठाण्यामागे, सिडको
- प्रभाग २७, २९, ३१: राजे संभाजी स्टेडियम, सिडको
- प्रभाग ८, ९, १०, ११: सातपूर क्लब हाउस, सातपूर
निवडणूक प्रक्रिया सुरक्षित, पारदर्शक आणि पर्यावरणपूरक व्हावी यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.