नाशिक शहरात सध्या गगनचुंबी इमारतींच्या बांधकामाला वेग आला असून, अशा उंच इमारतींमध्ये सुरक्षेची जबाबदारी अधिक महत्त्वाची बनली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागाने अखेर ९० मीटर उंचीची आधुनिक शिडी फिनलँडहून खरेदी केली आहे. ही शिडी नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजेच जानेवारीत शहरात दाखल होणार आहे.
महापालिकेकडून संबंधित कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. शिडी शहरात पोहोचताच कंपनीला देयक दिले जाणार आहे. या व्यवहारासाठी तारण म्हणून अग्निशमन विभाग ३३ कोटी रुपये बँकेत ठेवीच्या स्वरूपात ठेवणार आहे. या निधीवरील व्याज महापालिकेच्याच खात्यात जमा होणार असून शिडीसाठी एकूण ३८ कोटी रुपयांचा खर्च निश्चित करण्यात आला आहे.
सध्या शहरातील बांधकाम नियमांनुसार ९० मीटर उंच इमारतींना मंजुरी देण्यात येत आहे. त्यामुळे भविष्यात उंच इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. शहरातील सुमारे २५ इमारती या ३० मजल्यांपेक्षा जास्त उंच असून अनेक प्रस्ताव नगररचना विभागातर्फे मंजूर करण्यात आले आहेत.
अशा उंच इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी ९० मीटर शिडी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ती ३० मजल्यांपर्यंत आग विझविण्यास सक्षम असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत मोठी मदत होणार आहे. यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती आणि ती आता यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे.
नव्या वर्षात नाशिक शहराला आधुनिक आणि सक्षम अग्निशमन यंत्रणेची ही महत्त्वाची भर मिळत आहे.