माघी श्री गणेश जयंती का साजरी करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व, उपासना पद्धत आणि पूजेचे नियम

माघ शुद्ध चतुर्थी या तिथीला माघी श्री गणेश जयंती साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी श्री गणेश प्रथम पृथ्वीवर अवतरले, म्हणजेच त्यांचा जन्म झाला, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी होता. तेव्हापासून चतुर्थी आणि श्री गणेश यांचे अतूट नाते निर्माण झाले. त्यामुळेच ही तिथी ‘श्री गणेश जयंती’ म्हणून ओळखली जाते.

या तिथीचे विशेष महत्त्व असे की, माघ शुद्ध चतुर्थीला श्री गणेशाचे तत्त्व नेहमीच्या तुलनेत सुमारे एक सहस्र पटीने अधिक सक्रिय असते. गणपतीच्या स्पंदनांचा आणि चतुर्थी तिथीच्या स्पंदनांचा परस्परांशी सुसंवाद असल्याने, त्या दिवशी गणेशतत्त्व पृथ्वीवर अधिक प्रमाणात अवतरते. म्हणूनच या दिवशी केलेली गणेशोपासना अधिक फलदायी मानली जाते.

प्रत्येक महिन्यातील चतुर्थीला गणेशतत्त्व विशेष प्रमाणात कार्यरत असते; मात्र माघ महिन्यातील चतुर्थीला त्याचे महत्त्व अधिक वाढते. या दिवशी श्रद्धेने केलेली पूजा, नामजप आणि स्तोत्रपठण यांमुळे भक्ताला गणेशतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ मिळतो.

माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी दिवसभर श्री गणेशाचा नामजप करावा. भावपूर्ण पूजा आणि आरती करावी. श्री गणेशाला लाल रंगाची फुले आणि दूर्वा अर्पण कराव्यात. सायंकाळच्या वेळी श्री गणेश स्तोत्रांचे पठण करावे आणि घरात सात्त्विक वातावरण निर्मितीसाठी नामजप पट्टी लावावी.

कलियुगात देवतेच्या विविध उपासनांपैकी नामजप ही सर्वात श्रेष्ठ, सोपी आणि सुलभ उपासना मानली जाते. नामजपामुळे भक्त आणि देवता यांच्यात सतत अनुसंधान निर्माण होते. मात्र नामजपाचा योग्य उच्चार आणि भाव आवश्यक असतो. अर्थ समजून, मन एकाग्र करून केलेला नामजप अधिक परिणामकारक ठरतो आणि भक्तीभाव लवकर जागृत होतो.

स्तोत्र म्हणजे देवतेची स्तुती. स्तोत्रपठण केल्याने पठण करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावर संरक्षक कवच निर्माण होते, जे नकारात्मक शक्तींंपासून संरक्षण देते. श्री गणेशाची ‘संकष्टनाशन स्तोत्र’ आणि ‘गणपति अथर्वशीर्ष’ ही दोन स्तोत्रे विशेष प्रसिद्ध आहेत. विशिष्ट लय आणि सुरात केलेले स्तोत्रपठण चैतन्यदायी ऊर्जा निर्माण करते, म्हणून ठरावीक लय पाळणे आवश्यक असते.

पूजा करताना श्री गणेशाला गंध उजव्या हाताच्या अनामिकेने लावावा. हळद-कुंकू वाहताना प्रथम हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताचा अंगठा व अनामिका यांच्या चिमटीत घेऊन श्री गणेशाच्या चरणांवर अर्पण करावे. या मुद्रेमुळे पूजकाच्या अनाहतचक्राला चालना मिळते आणि भक्तीभाव वृद्धिंगत होतो.

श्री गणेशाला तांबडी जास्वंदाची फुले विशेष प्रिय मानली जातात. या फुलांमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असल्याचे मानले जाते. फुले ८ किंवा ८ च्या पटीत, शंकरपाळीच्या आकारात अर्पण करावीत. फुलांचा देठ श्री गणेशाच्या चरणांकडे आणि तुरा आपल्या दिशेने राहील, अशा पद्धतीने फुले वाहावीत.

दूर्वा या श्री गणेश पूजेतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत. दूर्वांमध्ये गणेशतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अत्याधिक असल्याने त्या अर्पण केल्या जातात. दूर्वा नेहमी विषम संख्येत — किमान ३, ५, ७ किंवा २१ — अर्पण कराव्यात. कोवळ्या, हिरव्या दूर्वा एकत्र बांधून, पाण्यात भिजवून वाहाव्यात, जेणेकरून त्या टवटवीत राहतील. दूर्वा अर्पण करताना पात्यांचा भाग भक्ताकडे आणि देठाचा भाग श्री गणेशाच्या मूर्तीकडे असावा. यामुळे गणेशतत्त्व भक्ताकडे अधिक प्रमाणात प्रक्षेपित होते, अशी धार्मिक समजूत आहे.

अशा प्रकारे विधीपूर्वक आणि श्रद्धेने साजरी केलेली माघी श्री गणेश जयंती भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा, शांती आणि संकटांपासून मुक्ती देणारी ठरते.

नाशिक शहरातील गणेश मंदिरे

Shree Dholya Ganpati Mandir

Navshya Ganpati Temple

Anna Ganapati Temple