डिसेंबरमधील धान्यसाठा उशिराने; जिल्ह्यातील ४०० दुकानांचे वितरण ठप्प होण्याची शक्यता

डिसेंबर महिन्यातील धान्यसाठा वेळेत उपलब्ध न झाल्याने जिल्ह्यातील तब्बल ४०० रेशन दुकानदारांचे धान्यवाटप ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नियमितपणे दर महिन्याचा पुरवठा ५ तारखेपर्यंत दुकानांपर्यंत पोहोचवला जातो. मात्र, यावेळी पुरवठा प्रक्रियेत विलंब झाल्याने दुकानदारांसह कार्डधारकांनाही मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

धान्यपुरवठ्यासाठी आवश्यक वाहतूक रखडल्याने ई-पॉस मशीनद्वारे होणारे वितरणही बाधित झाले आहे. यामुळे अनेक कार्डधारकांना सरकारी धान्य मिळण्यात अडथळे निर्माण झाले असून, अनेकांना धान्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. धान्य वेळेत न मिळाल्यास उपलब्ध स्टॉक परत जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात असून, त्याचा थेट परिणाम दुकानदारांच्या कमिशनवर होणार आहे.

या परिस्थितीवर जिल्हा पुरवठा विभागाने लक्ष दिले असून सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड यांनी सांगितले की सध्याची वाहतूक समस्या लवकरच सोडवली जाईल. सर्व दुकानदारांना वेळेवर धान्य पोहोचवण्यासाठी आवश्यक व्यवस्था सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.