नाशिक महापालिकेने शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून स्मार्ट पार्किंग प्रकल्पासाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुरुवातीला या निविदेला ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नव्हता, मात्र फेरनिविदेनंतर तीन संस्थांनी २८ ठिकाणी स्मार्ट पार्किंग सुरू करण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत.
या संस्थांची काम करण्याची पात्रता तपासण्याची प्रक्रिया महापालिकेच्या टेंडर सेलमार्फत सुरू आहे. तांत्रिक तपासणीनंतरच कोणती संस्था पात्र आहे, हे स्पष्ट केले जाणार आहे.
वाहतूक सेलने शहरातील २२ ऑन-स्ट्रीट आणि ६ ऑफ-स्ट्रीट अशा एकूण २८ ठिकाणी स्मार्ट पार्किंग उभारण्याचे नियोजन केले आहे. प्रारंभी महापालिकेने ठेकेदाराने दरमहा ३५ लाख रुपये जमा करण्याची अट ठेवली होती. या कडक अटीमुळे ठेकेदारांनी पाठ फिरवली. त्यानंतर ही रक्कम २२ लाखांवर आणली, तरीही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी मनपाने रक्कम घटवून १३ लाख रुपये केली, आणि त्यानंतर तीन संस्थांनी अर्ज दाखल केले.
१७ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झालेल्या या निविदेचे उद्दिष्ट शहरातील वाहनांची वाढती संख्या आणि पार्किंगची कमतरता कमी करणे हे आहे. मुख्य रस्त्यांवर वाहनांची अव्यवस्थित पार्किंग झाल्याने नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविक नाशिकला येणार असल्याने मनपा वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देत आहे.
वाहतूक सेलचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल यांनी सांगितले की स्मार्ट पार्किंग प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर सुमारे ४,१५५ वाहने विशिष्ट ठिकाणी पार्क करता येणार आहेत. त्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागातील वाहतूक भार मोठ्या प्रमाणात कमी होईल.