नाशिकमध्ये अवैध नायलॉन मांजा विक्रीवर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; 60 हजारांचा माल जप्त

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) संदीप मिटके यांनी शहरात अवैध नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
या आदेशानुसार गुन्हे शाखा युनिट क्र. 1 चे अधिकारी व अंमलदार तपास करत असताना पोलीस कर्मचारी नितीन जगताप आणि विलास चारोस्कर यांना गोपनीय माहिती मिळाली की टाकळी रोड, आढाव मळा या भागात एक युवक खुलेआम नायलॉन मांजा विक्री करीत आहे.

सदर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना कळविल्यानंतर त्यांनी खात्री करून तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
यानुसार गुन्हे शाखेने सापळा रचून संशयित व्यक्तीला पांढऱ्या गोणीत नायलॉन मांजाचे गुंडाळे विकताना ताब्यात घेतले.

चौकशीदरम्यान त्याने आपले नाव अक्षय प्रभाकर देवळेकर (वय 29, रा. काठेगली, लेन नं. 2, त्रिकोणी गार्डन शेजारी, नाशिक) असे सांगितले. त्याच्या ताब्यातून एकूण 60 गुंडाळ्या जप्त करण्यात आल्या असून त्याची बाजारभाव किंमत 60,000 रुपये इतकी आहे.

सदर आरोपीविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5, 15, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 223, 292, 293 तसेच मपोकाक 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण आणि सहायक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल, पीएसआय चेतन श्रीवंत, पोहवा महेश साळंके, रविंद्र आढाव, तसेच पोलीस कर्मचारी नितीन जगताप, विलास चारोस्कर, राम बर्डे आणि चालक समाधान पवार यांनी संयुक्तपणे केली.