नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतुकीला अधिक सक्षम करण्यासाठी नाशिक महानगर परिवहन महामंडळ लि. (सिटीलिंक) प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोमवार, २७ एप्रिलपासून शहरात तीन नवीन बसमार्गांवर सेवा सुरू करण्यात आली आहे. या नव्या उपक्रमामुळे विविध भागांतील प्रवाशांना अधिक सुलभ आणि नियमित प्रवासाचा लाभ मिळणार आहे.
प्रवाशांना भेडसावणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन हे मार्ग नियोजन करण्यात आले आहे. शहरातील वाढत्या वाहतूक गरजा पूर्ण करण्यासाठी सिटीलिंककडून हा विस्तार करण्यात आला असून नागरिकांकडून याचे स्वागत होत आहे.
मार्ग क्रमांक ११४ – नाशिकरोड ते मखमलाबाद (जेलरोड मार्गे)
या मार्गावर नाशिकरोड, जेलरोड, नारायणबापूनगर, निलगिरीबाग, हनुमाननगर, आरटीओ कॉर्नर आणि म्हसरूळ या प्रमुख ठिकाणांचा समावेश आहे.
या मार्गावर एकूण ३० बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या असून, दर ३० मिनिटांनी बस उपलब्ध राहणार आहे.
मार्ग क्रमांक २१९ – नाशिकरोड ते बारदान फाटा (विहितगाव मार्गे)
या मार्गावर वडनेर, पाथर्डी फाटा आणि सातपूर येथील एक्सलो पॉइंटपर्यंत सेवा दिली जाणार आहे.
या मार्गासाठी एकूण ४८ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी २४ फेऱ्या असतील. बस दर अर्ध्या तासाने उपलब्ध असेल.
मार्ग क्रमांक १०६ – तपोवन ते अमृतानगर (महामार्ग मार्गे)
या मार्गावर पंचवटी, महामार्ग, लेखानगर, गामणे, सावंत गार्डन, कृष्णाईनगर आणि चौक यांसारख्या भागांचा समावेश आहे.
या मार्गावर एकूण ५६ फेऱ्या (जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी २९) सुरू असून, प्रवाशांना दर १५ मिनिटांनी बस मिळणार आहे.
सिटीलिंक प्रशासनाने नागरिकांना या नवीन बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. नवीन मार्गांमुळे नाशिकमधील प्रवास अधिक सुलभ, जलद आणि किफायतशीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.