नाशिकमध्ये सायबर फसवणुकीचा नवा डाव! महानगरपालिकेच्या नावाने व्हॉट्सअपवर धमकीचे मेसेज

नाशिक शहरात सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, फसवणूक करणाऱ्यांनी आता थेट नाशिक महानगरपालिकेच्या नावाचा गैरवापर करण्यास सुरुवात केली आहे. अधिकृत लोगोचा वापर करून नागरिकांना व्हॉट्सअॅपवर धमकीचे संदेश पाठवले जात असल्याचे उघड झाले आहे.

सायबर गुन्हेगारांकडून शहरातील अनेक नागरिकांना “तुमची पाणीपट्टी आणि घरपट्टी थकीत आहे, ती तत्काळ भरली नाही तर तुमचे कनेक्शन बंद केले जाईल” अशा आशयाचे मेसेज पाठवण्यात आले. हे मेसेज इंग्रजी भाषेत पाठवण्यात आले असून, त्यात महानगरपालिकेचा अधिकृत लोगो प्रोफाइल फोटो म्हणून वापरण्यात आला होता. त्यामुळे अनेकांना हे संदेश खरे असल्याचा भास झाला.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत महानगरपालिका प्रशासनाने तत्काळ सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, 6005481746 आणि 6297019792 या क्रमांकांवरून हे मेसेज मोठ्या प्रमाणात पाठवण्यात आले.

फसवणूक करणाऱ्यांनी नागरिकांना विश्वासात घेण्यासाठी “बिल अपडेट करण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधा” असेही नमूद केले होते. या माध्यमातून नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवून पुढील फसवणूक करण्याचा डाव असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे, यापूर्वीही अशाच पद्धतीने पाणीपुरवठा, वीजबिल, एमएनजीएल सेवा किंवा ई-चलनाच्या नावाखाली लिंक आणि APK फाइल्स पाठवून अनेकांना आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे यावेळीही नागरिकांच्या बँक खात्यातील रक्कम लाटण्याचा प्रयत्न असू शकतो, अशी शक्यता तपासात व्यक्त केली जात आहे.

सायबर पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू असून, नागरिकांनी अशा कोणत्याही संशयास्पद मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच अनोळखी क्रमांकांशी संपर्क टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी कोणतीही शंका असल्यास अधिकृत महानगरपालिका कार्यालयाशी संपर्क साधावा आणि स्वतःची माहिती सुरक्षित ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.