नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा 2027 मध्ये लाखो भाविक दर्शनासाठी येणार आहेत. या प्रचंड गर्दीत भाविकांना कोणत्याही क्षणी आरोग्यसेवेची गरज भासू शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आणि आधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करण्यासाठी समन्वयित नियोजन सुरू केले आहे.
9 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी कुंभकाळात प्रमुख ठिकाणी फिरती वैद्यकीय पथके तैनात करण्याचे निर्देश दिले. या पथकांमुळे भाविकांना जागेवरच उपचार मिळू शकतील.
यावेळी प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर, ग्रामीण पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे, तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्तांनी सांगितले की, कुंभमेळ्यात देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार व अद्ययावत आरोग्यसेवा उपलब्ध ठेवणे अत्यावश्यक आहे. रुग्णालयांचे श्रेणीवर्धन, आयसीयू कक्ष कार्यान्वित ठेवणे, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सक्षम मनुष्यबळ आणि आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात आले.
साधुग्राम, घाट परिसर, वाहनतळ, रेल्वे स्थानके, बसस्थानके, आखाडे आणि पर्यटन स्थळांवर आरोग्यसेवा केंद्रे, मदत कक्ष, एम्बुलन्सची व्यवस्था केली जाणार आहे. सध्याच्या सरकारी, निमशासकीय आणि खासगी रुग्णालयांमधील उपलब्ध सेवा, उपकरणे, औषधसाठा यांची माहिती संकलित करून वाढीव आरोग्यसेवेचे नियोजन करण्यात येत आहे.
कुंभकाळात सेवेसाठी नियुक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासाची आधुनिक व्यवस्था सुनिश्चित केली जाणार आहे. तसेच आपत्कालीन सेवांसाठी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयापर्यंतचा मार्ग निश्चित करण्यात येईल.
कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि आरोग्य विभागाने नियोजनाची सविस्तर माहिती सादर केली. प्रशासनाचा उद्देश प्रत्येक भाविकाला वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करणे हा आहे.