तपोवन वृक्ष आंदोलनात अचानक शांतता, २७ दिवसांनंतर अल्प उपस्थिती

सोमवारी (दि. १५) सिंहस्थ मेळामंत्री नाशिकमध्ये वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आले असताना तपोवन येथील आंदोलनस्थळी मात्र अनपेक्षित शांतता पाहायला मिळाली. नेहमी घोषणाबाजी आणि आंदोलनामुळे गजबजणारा परिसर सोमवारी जवळपास ओस पडलेला दिसत होता. मोजकेच वृक्षप्रेमी उपस्थित होते, तर बहुतांश कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनस्थळी फिरकलेच नाहीत.

‘तपोवन वाचवा, झाडे वाचवा’ या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला तब्बल २७ दिवस पूर्ण झाले आहेत. या कालावधीत सातत्याने निषेध, विविध संघटनांचा पाठिंबा आणि नागरिकांची मोठी उपस्थिती दिसून येत होती. त्यामुळे तपोवन परिसर कायम चर्चेत राहिला होता.

आता मात्र तपोवनातील घडामोडी या योगायोगाने घडत आहेत की एखाद्या ठरावीक रणनीतीचा भाग आहेत, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. तपोवनातील वृक्षतोडीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित असल्याने पुढील काळात आंदोलनाची दिशा काय असेल, तसेच वृक्षप्रेमी पुन्हा एकत्र येतील का, याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

सतत चालू असलेल्या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असताना, मंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आंदोलनस्थळी दिसलेली अल्प उपस्थिती अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरली आहे. नाशिकमधील तपोवन वृक्ष आंदोलन हा विषय आता शहरात सर्वपरिचित झाला आहे.