नाशिकमध्ये प्रथमच “सूर्यकिरण एअर शो” — २३ जानेवारीला गंगापूर धरण परिसरात भव्य हवाई प्रात्यक्षिके

नाशिक फेस्टिव्हलचा एक विशेष आकर्षण म्हणून भारतीय वायुदलाच्या बिदर येथील ५२ स्कॉड्रनच्या सूर्यकिरण हवाई प्रात्यक्षिक पथकाच्या सहकार्याने २३ जानेवारी २०२६ रोजी गंगापूर धरण परिसरात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत भव्य सूर्यकिरण एअर शोचे आयोजन करण्यात येणार आहे. नाशिक शहरात प्रथमच अशा स्वरूपाचा हवाई प्रात्यक्षिक कार्यक्रम होत असून नागरिकांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार आहे.

या कार्यक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित प्रशासकीय विभागांनी सूक्ष्म आणि समन्वयात्मक नियोजन करावे, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांकडून तयारीची माहिती घेतली.

या बैठकीस नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपवनसंरक्षक सिद्धेश सावर्डेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता नवनाथ सोनवणे, निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, उपविभागीय अधिकारी अर्पिता ठुबे, पर्यटन विभागाचे उपसंचालक डॉ. नंदकुमार राऊत, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल विलासराव सोनवणे, एमटीडीसीचे व्यवस्थापक जगदीश चव्हाण, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळू पाटील यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले की, नाशिकमध्ये प्रथमच होत असलेल्या या कार्यक्रमामुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक व पर्यटक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, अग्निशमन सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि गर्दी नियंत्रण या सर्व बाबींवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येक विभागाने दक्ष राहावे, असे त्यांनी अधोरेखित केले.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्याला देशसेवेचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. या एअर शोच्या माध्यमातून त्या परंपरेला उजाळा मिळेल तसेच तरुण पिढीमध्ये देशभक्तीची भावना अधिक बळकट होईल. यासोबतच नाशिकमधील पर्यटनस्थळांची माहिती देशभरातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची ही एक महत्त्वाची संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

प्रशासन, पर्यटन विभाग, पोलिस यंत्रणा आणि भारतीय वायुदल यांच्या संयुक्त सहकार्यामुळे हा सूर्यकिरण एअर शो सुरक्षित, शिस्तबद्ध आणि संस्मरणीय ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. नाशिककरांसाठी हा कार्यक्रम केवळ मनोरंजनाचा नसून प्रेरणादायी आणि अभिमानाचा क्षण ठरणार आहे.