सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या नांदुरी घाटमार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्त्याचे काँक्रिटीकरण व संरक्षक भिंतीचे काम सुरू असल्याने वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. १२ जानेवारी ते १५ मार्च २०२६ या कालावधीत या मार्गावर एकेरी वाहतूक व्यवस्था लागू राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हा घाटमार्ग सुमारे १० किलोमीटर लांबीचा असून तो अरुंद, तीव्र वळणांचा आणि चढ-उतार असलेला आहे. काही ठिकाणी दृश्यमानताही मर्यादित असल्यामुळे काम सुरू असलेल्या ठिकाणी वाहतूक वळविणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने महसूल प्रशासनाला दिली होती.
विशेषतः सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणावर भाविक आणि वाहनांची गर्दी होत असल्यामुळे वाहतूक कोंडी आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सहायक अभियंता रोहिणी वसावे यांनी सांगितले. सहायक जिल्हाधिकारी डॉ. काश्मिरा संखे यांनी या संदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत.