सिंहस्थासाठी साधुग्राममधील झाडतोड अपरिहार्य, बदल्यात १५ हजार झाडांची लागवड – मंत्री गिरीश महाजन

नाशिक येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक व्यवस्था उभारताना साधुग्राम परिसरातील काही झाडे तोडावी लागणार असल्याचे कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. मागील सिंहस्थ काळात ज्या जागेवर साधूंची व्यवस्था करण्यात आली होती, त्याच क्षेत्रात विकासकामे प्रस्तावित असून, त्याऐवजी पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी तब्बल १५ हजार झाडांची लागवड केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

साधुग्रामची शेकडो वर्षांची परंपरा असूनही, झाडतोडीच्या मुद्द्यावरून नाशिकची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. गोदावरी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्रकल्पासाठी सुमारे २०० झाडे तोडण्यात आली असून, त्यासाठी चार महिन्यांपूर्वीच अधिकृत परवानगी घेण्यात आली होती. मात्र, त्या ठिकाणीही काही पर्यावरणप्रेमींनी विरोध दर्शविला, असे महाजन म्हणाले. “असा विरोधच करायचा असेल, तर गोदावरी प्रदूषित ठेवायची का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

महाकवी कालिदास कलामंदिरात विविध विकासकामांचे भूमिपूजन करताना मंत्री महाजन बोलत होते. यावेळी आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, सिंहस्थ आयुक्त शेखर सिंह, मनपा आयुक्त मनीषा खत्री, तसेच विविध धार्मिक आणि प्रशासकीय मान्यवर उपस्थित होते.

महाजन म्हणाले की, आगामी सिंहस्थात मागील वेळेपेक्षा तिप्पट भाविक येण्याची शक्यता आहे. प्रयागराजमध्ये स्नानासाठी किलोमीटर लांबीचे घाट उपलब्ध असताना नाशिकमध्ये जागा मर्यादित आहे. रामकाल पथ प्रकल्पात नागरिकांनी सहकार्य केले असून, कोणालाही बेघर केलेले नाही. बाधित नागरिकांना पर्यायी व्यवस्था करून एका वर्षात सदनिका दिल्या जातील.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंहस्थासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. गोदावरी स्वच्छता, सात हजार कोटींचा रिंगरोड, रस्ते रुंदीकरण आणि औद्योगिक संधींमुळे नाशिकचा चेहरामोहरा बदलणार असल्याचे महाजन यांनी सांगितले.

साधूंविषयी बोलताना काहीजण आक्षेपार्ह विधाने करत असल्याचा उल्लेख करून, बोलताना संयम बाळगण्याचे आवाहनही त्यांनी केले.