नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत सेवा मिळाव्यात या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या ‘आपले सरकार’ पोर्टलवर आता पोलिस विभागाच्या १७ महत्त्वाच्या सेवा पूर्णतः ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पोलिस ठाणे किंवा आयुक्तालयात वारंवार जावे लागणार नाही. अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची पूर्तता आणि सेवा मंजुरी ही सर्व प्रक्रिया आता डिजिटल माध्यमातून पार पडणार आहे.
नागरिक घरबसल्या किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमधून अर्ज सादर करू शकतात. अर्जाची सद्यस्थिती, मंजुरी किंवा नामंजुरी याची माहितीही ऑनलाईनच मिळणार आहे. सेवा हक्क कायद्यानुसार ठरवून दिलेल्या कालमर्यादेत संबंधित विभागाला सेवा देणे बंधनकारक असल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत.
या उपक्रमामुळे पोलिस ठाण्यांवरील गर्दी कमी होण्यास मदत होईल तसेच प्रशासकीय कामकाज अधिक कार्यक्षम होईल. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नागरिकांना डिजिटल सुविधांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले आहे. पोर्टलवर नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यास सेवा जलद आणि सोप्या पद्धतीने मिळतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
परदेश प्रवास, शस्त्र परवाना, कार्यक्रम परवानगी, चित्रपट चित्रीकरण, मनोरंजन कार्यक्रम यांसारख्या सेवा आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामुळे प्रशासनातील पारदर्शकता वाढणार असून भ्रष्टाचारालाही आळा बसण्यास मदत होणार आहे.
आपले सरकार पोर्टलवरील प्रमुख पोलिस सेवा :
- विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी
- ध्वनीक्षेपक (लाऊडस्पीकर) परवाना
- सभा, संमेलन, मिरवणूक व शोभायात्रा परवानगी
- पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल व बारसाठी ना-हरकत प्रमाणपत्र
- पोलिस क्लिअरन्स प्रमाणपत्र
- सिनेमागृह परवाना व नूतनीकरण
- चित्रपट किंवा मालिका चित्रीकरणासाठी जागेचा परवाना
- मनोरंजन कार्यक्रमांसाठी ना-हरकत प्रमाणपत्र
- शस्त्र परवान्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र
- परदेश प्रवासासाठी पोलिस अनुमती प्रमाणपत्र (शिक्षण व नोकरीसाठी)
- एफआयआरची प्रत ऑनलाईन
- तमाशा, मेळा व सार्वजनिक मनोरंजन कार्यक्रमांसाठी परवाना व नियंत्रण
या डिजिटल उपक्रमामुळे महाराष्ट्रातील नागरिकांना अधिक सुलभ, वेगवान आणि पारदर्शक सेवा मिळणार असून ‘डिजिटल महाराष्ट्र’ संकल्पना अधिक बळकट होणार आहे.