नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाची सुरुवात देवदर्शनाने करत संपूर्ण वर्ष सुख-समाधानाने जावो, अशी प्रार्थना करत नाशिककरांनी नववर्षाचे स्वागत केले. वर्षाची सुरुवात शुभ कार्याने केली तर संपूर्ण वर्ष मंगलमय जाते, अशी श्रद्धा असल्याने शहरातील विविध मंदिरांमध्ये सकाळपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
कपालेश्वर महादेव मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. दर्शनानंतर नागरिकांनी मित्र-परिवारासोबत हॉटेलिंगचा आनंद घेत विविध पदार्थांचा आस्वाद घेत नववर्षाचा उत्साह साजरा केला. परिणामी, शहरातील अनेक हॉटेल्स, विशेषतः मिसळ प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती.
नाशिक हे धार्मिक आणि पर्यटनाचे केंद्र असल्याने ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढली होती. सोमेश्वर महादेव, नवश्या गणपती, चांदीचा गणपती, कालिका माता मंदिर, विल्होळी येथील जैन मंदिर आणि तपोवन परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी विशेष गर्दी उसळली होती. त्याचप्रमाणे वणी येथील सप्तशृंगगडावरही दर्शनासाठी भाविकांची लांबलचक रांग दिसून आली.
सायंकाळी स्वामीनारायण मंदिर, स्वामी समर्थ केंद्र, निवृत्तिनाथ मंदिर तसेच वाढोली येथील शक्तिपीठ येथेही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. संपूर्ण शहरात भक्ती, पर्यटन आणि आनंदाचे वातावरण पसरले होते.
एकूणच नवीन वर्ष २०२६चा पहिला दिवस नाशिकमध्ये भक्तिमय, उत्साही आणि पर्यटनाने फुललेला असा अनुभव देणारा ठरला.