नाशिक जिल्ह्यातील मोहाडी (ता. दिंडोरी) येथील सह्याद्री फॉर्म येथे नैसर्गिक शेतीच्या प्रसारासाठी विशेष संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. त्यांनी नैसर्गिक शेतीचे पर्यावरणीय, आर्थिक आणि सामाजिक फायदे सविस्तरपणे मांडले.
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी सांगितले की, नैसर्गिक शेती ही केवळ शेती करण्याची एक पद्धत नसून ती शेतकरी, ग्राहक आणि संपूर्ण समाजाच्या आरोग्याची चळवळ आहे. रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून स्थानिक संसाधनांचा योग्य वापर केल्यास शाश्वत शेती सहज शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी बीजामृत, जीवामृत, घनजीवामृत, आच्छादन (मल्चिंग), मिश्र पिके, पीक फेरपालट तसेच देशी गोवंशाच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. या पद्धतींचा अवलंब केल्यास जमिनीची सुपीकता वाढते, पाण्याची धरपकड क्षमता सुधारते, कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि उत्पादनाचा दर्जाही लक्षणीयरीत्या सुधारतो, असे त्यांनी नमूद केले.
हा कार्यक्रम राज्यपालांचा राज्यातील शेतकऱ्यांसाठी नैसर्गिक शेती संवादाचा पहिलाच उपक्रम होता. भविष्यात अशा प्रकारचे संवाद कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात घेऊन नैसर्गिक शेतीबाबत जनजागृती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
या संवाद कार्यक्रमास नाशिक जिल्ह्यातील शेतकरी, कृषी सखी, शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपल्या अनुभवांची देवाणघेवाण केली तसेच नैसर्गिक शेती करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपायांवर खुलेपणाने चर्चा केली.
या कार्यक्रमातून नैसर्गिक शेतीचा अधिक व्यापक प्रसार, प्रशिक्षण व मार्गदर्शन जिल्हास्तरावर प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, राजभवन सचिव प्रशांत नारनवरे, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष काटकर, सह्याद्री फार्मचे अध्यक्ष विलास शिंदे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, मुख्य वनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने, प्रकल्प संचालक (आत्मा) अभिमन्यू काशीद तसेच इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी केले, समारोप विलास शिंदे यांनी केला तर सूत्रसंचालन प्रमोद राजेभोसले यांनी केले.