नाशिक महापालिकेच्या येत्या महिन्यात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेत महत्त्वाचा बदल जाहीर केला आहे. मतदान अधिक सुलभ, अचूक आणि पारदर्शक व्हावे यासाठी आता मतदारांच्या बोटावर पारंपरिक शाईऐवजी मार्कर पेनने निशाणी केली जाणार आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.
निवडणुकांदरम्यान बोगस मतदानाबाबत अनेकदा राजकीय पक्षांकडून तक्रारी आणि आरोप केले जातात. अशा प्रकारच्या तक्रारींना आळा घालण्यासाठी आणि मतदान प्रक्रियेवरील विश्वास वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मार्कर पेनच्या वापरामुळे मतदानानंतरची निशाणी अधिक स्पष्ट राहील, असा आयोगाचा विश्वास आहे.
राज्य निवडणूक आयोगाने मतदान केंद्राध्यक्ष तसेच मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देताना मार्कर पेनच्या योग्य वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन देण्याचे निर्देश दिले आहेत. मतदानावेळी मतदाराच्या हाताच्या बोटाला ठरावीक पद्धतीने मार्कर पेनने खूण करणे बंधनकारक असेल. तसेच मतदार मतदान करून केंद्र सोडण्यापूर्वी ती निशाणी स्पष्ट आणि कायम आहे याची खात्री संबंधित अधिकाऱ्यांनी करून घ्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
मार्कर पेनचा वापर करताना काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. पेन दाबून वापरणे, वापरात नसताना झाकण घट्ट बंद ठेवणे आणि पेन आडवे ठेवणे गरजेचे असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे. यामुळे पेनची शाई योग्य प्रकारे वापरात येईल आणि मतदान प्रक्रियेत अडथळे येणार नाहीत.
हा नियम केवळ नाशिक महापालिका निवडणुकीपुरता मर्यादित नसून, राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लागू केला जाणार आहे. यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी तसेच महानगरपालिका आयुक्तांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. या निर्णयामुळे आगामी निवडणुकांमध्ये पारदर्शकता वाढेल आणि मतदान प्रक्रियेवरील विश्वास अधिक मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.