नाशिकमध्ये दत्त जयंती उत्साहात साजरी; दत्त जन्मोत्सवासाठी भक्तांची मोठी गर्दी

नाशिक शहरातील विविध दत्त मंदिरांमध्ये गुरुवारी (दि. ४) दत्त जयंतीनिमित्त दत्त जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळपासून शहरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते आणि दत्त मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

गोदाघाटावरील एकमुखी दत्त मंदिरात अखंड श्रीमद् गुरुचरित्र पारायण सोहळ्याचा समारोप होता. दर्शनासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. पहाटे ५.३० वाजता अभिषेक, तसेच संध्याकाळी ६.१५ वाजता पार पडलेला दत्त जन्मोत्सव सोहळा, महाआरती आणि महाप्रसादाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला. दत्तजन्मोत्सवानंतर आकर्षक आतषबाजी करण्यात आली.

नाशिक शहरातील सिडको, देवळाली कॅम्प, जुने नाशिकरोड, इंदिरानगर, सातपूर आणि गोदाघाटातील सर्व दत्त मंदिरांमध्ये दिवसभर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात यथासांग पूजा, लघुरुद्राभिषेक, अभिषेक, पारायण, कीर्तन आणि पालखी सोहळ्यात भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला.

भाविकांच्या मोठ्या गर्दीचे योग्य नियोजन करण्यासाठी विविध मंदिर ट्रस्टच्या वतीने स्वतंत्र रांगा, प्रसाद विभाग, सुरक्षा, स्वच्छता आणि मार्गदर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. शहरातील चौकाचौकांत आकर्षक सजावट, रोषणाई आणि दत्त जयंतीच्या शुभेच्छा देणारे फलक झळकत होते.