मराठा विद्या प्रसारक (एमव्हीपी) समाज, नाशिकने शहरातील बेरोजगार तरुण-तरुणींना दर्जेदार मार्गदर्शनासह मोफत नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्वाची मोहीम सुरू केली आहे. एमव्हीपीच्या राजर्षी शाहू महाराज पॉलिटेक्निकमध्ये केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालय व सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने मॉडेल करिअर सेंटर सुरू करण्यात आले आहे.
दहावी, बारावी, पदवी तसेच विविध क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहे. प्राचार्य प्रशांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह केंद्रात हजर राहिल्यास तत्काळ उपलब्ध नोकऱ्यांची माहिती दिली जाते तसेच मुलाखतींची व्यवस्था करण्यात येते. सर्व सेवा पूर्णपणे मोफत आहेत.
केंद्र सरकार आणि सीआयआयच्या E2E (Education to Employment) प्रकल्पाची अंमलबजावणी नाशिकमध्ये करण्यासाठी एमव्हीपीच्या पॉलिटेक्निकची निवड करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत मुंबईतील सुमारे एक लाख युवकांना या प्रकल्पाद्वारे रोजगार मिळाला आहे. नाशिकमध्ये देखील मोठ्या प्रमाणात कौशल्यविकास प्रशिक्षण, रोजगार मेळावे आणि मार्गदर्शन सत्रे आयोजित केली जात आहेत.
या प्रकल्पासाठी सीआयआयने सहा पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त केले असून त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी टीपी ऑफिसर प्रा. सुशांत आहेर (7709997288) व केंद्राचे व्यवस्थापक सागर शिरसाठ (7219707331) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एमव्हीपीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.