मनपा निवडणूक २०२६ अंतर्गत गुरुवारी (दि. १५) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदानाच्या दिवशी मतदारांची ओळख पटवण्यासाठी १३ प्रकारची ओळखपत्रे वैध असल्याची माहिती नाशिक महानगरपालिकेकडून देण्यात आली आहे.
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक मतदाराकडे या १३ पैकी कोणतेही एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील ओळखपत्रांचा समावेश आहे —
निवडणूक ओळखपत्र (EPIC कार्ड), भारताचा पासपोर्ट, आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, आयकर विभागाचे पॅन कार्ड, केंद्र किंवा राज्य शासन तसेच सार्वजनिक उपक्रम किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचाऱ्यांना दिलेली फोटोसहित ओळखपत्रे.
तसेच राष्ट्रीयीकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसचे फोटो असलेले पासबुक, सक्षम प्राधिकरणाने दिलेला अपंगत्वाचा फोटोसहित दाखला, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील जॉबकार्ड, निवृत्त कर्मचाऱ्यांचे किंवा त्यांच्या विधवा व अवलंबितांचे फोटो असलेले निवृत्तीवेतन विषयक कागदपत्रे, संसद व राज्य विधिमंडळ सचिवालयांनी सदस्यांना दिलेली अधिकृत ओळखपत्रे, स्वातंत्र्य सैनिकांचे फोटो असलेले ओळखपत्र तसेच केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे फोटोसहित कार्ड देखील मतदानासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत.
मतदारांनी आपले मतदान केंद्र आणि बूथ शोधण्यासाठी मनपाने उपलब्ध करून दिलेल्या QR कोड स्कॅनिंग सुविधेचा वापर करावा. तसेच अधिकृत आणि अचूक माहितीसाठी नाशिक महानगरपालिकेच्या सोशल मीडिया चॅनल्सना फॉलो करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“मी नाशिकचा जागरूक मतदार” या भावनेतून प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले लोकशाही कर्तव्य बजावावे, असे आवाहन मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी केले आहे.
मतदान हा लोकशाहीचा कणा असून प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे योग्य ओळखपत्रासह वेळेत मतदान केंद्रावर पोहोचून मतदान करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.