मकरसंक्रांतीत पतंग उडवताना सुरक्षितता पाळा — जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

मकरसंक्रांती आणि पतंगोत्सव हे सण नाशिक जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. मात्र हा आनंद साजरा करताना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नागरिक व विद्यार्थ्यांना पतंग सुरक्षितरीत्या उडवण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी स्पष्ट केले की नायलॉन मांजाचा वापर टाळावा कारण तो मानव, प्राणी आणि विशेषतः पक्ष्यांसाठी अत्यंत धोकादायक आहे. नायलॉन मांजामुळे गळा कापला जाणे, गंभीर जखमा होणे आणि काही वेळा मृत्यू होण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

पतंग शक्यतो मैदानावरून उडवावी. रस्त्यावर, झाडांजवळ किंवा वीजतारांच्या जवळ पतंग उडवणे टाळावे. छतावर उभे राहून पतंग उडविल्यास खाली पडण्याचा धोका संभवतो, ज्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो.

सूर्याकडे पाहून पतंग उडवत असताना डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी गॉगलचा वापर करावा. पतंग उडवून झाल्यावर त्याचे तुकडे आणि मांजा गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावावी.

पतंगोत्सव हा केवळ आनंदाचा सण नसून तो सामाजिक जबाबदारीही आहे. प्रत्येकाने स्वतःची तसेच इतर नागरिकांची, पक्ष्यांची आणि पर्यावरणाची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे.