मकर संक्रांतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. सणाचा आनंद घेताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी वीज सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की, शहरी तसेच ग्रामीण भागात सर्वत्र उच्च व लघुदाबाच्या वीजवाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. त्यामुळे पतंग उडवताना वीजवाहिन्या, फीडर, खांब तसेच इतर विद्युत यंत्रणांपासून सुरक्षित अंतर राखणे आवश्यक आहे. विशेषतः नायलॉन मांजाचा वापर टाळावा, कारण अशा मांजावर कायदेशीर बंदी आहे आणि त्यावर असलेले धातुमिश्रित कोटिंग वीजप्रवाह वहन करू शकते.
अनेक वेळा कटलेले पतंग वीजतारांवर किंवा खांबांवर अडकतात. अशा वेळी काठी, लोखंडी सळई, गिरगोट किंवा इतर कोणत्याही साधनांनी अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये. विजेच्या प्रवाहात असलेल्या तारेला स्पर्श झाल्यास गंभीर तसेच जीवघेणे अपघात होऊ शकतात.
कधी कधी अडकलेल्या पतंगाचा मांजा जमिनीवर लोंबकळत असतो. असा मांजा ओढल्यास तारांमध्ये घर्षण होऊन शॉर्टसर्किट होण्याची, आग लागण्याची किंवा वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता असते. यामुळे नागरिकांना गैरसोय तर होतेच, पण प्राणांतिक धोका निर्माण होऊ शकतो.
महावितरणने नागरिकांना आणि विशेषतः पालकांना आवाहन केले आहे की, लहान मुलांनी वीजवाहिन्यांपासून दूर, मोकळ्या आणि सुरक्षित मैदानातच पतंग उडवावेत. पालकांनी मुलांवर लक्ष ठेवावे, त्यांना योग्य मार्गदर्शन करावे आणि शक्य असल्यास स्वतः उपस्थित राहावे.
वादळी वाऱ्यामुळे किंवा पावसात वीजवाहिन्यांमध्ये अडकलेले पतंग व धागे वीजपुरवठा खंडित होण्याचे कारण ठरतात. त्यामुळे टाळता येण्याजोग्या अपघातांना आणि अडचणींना आमंत्रण मिळते. या सर्व दुर्दैवी घटना टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्कता व सावधगिरी बाळगावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी महावितरणच्या कॉल सेंटर क्रमांकांवर तात्काळ संपर्क साधावा — १९१२, १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५.