नाशिक सह सर्व 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; मतदान 15 जानेवारीला, निकाल 16 रोजी

नाशिक – सह महाराष्ट्रातील प्रलंबित 29 महापालिकांच्या निवडणुकांचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही घोषणा करत आजपासून १५ डिसेंबर २०२५ पासून राज्यभर आचारसंहिता लागू करण्यात आल्याची माहिती दिली.

घोषित कार्यक्रमानुसार, 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. या निवडणुकांमध्ये राज्यभरातून 3 कोटी 48 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

ओबीसी आरक्षणासंदर्भातील कायदेशीर प्रक्रियांमुळे गेल्या पाच ते सात वर्षांपासून या महापालिकांच्या निवडणुका रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. याच प्रक्रियेचा भाग म्हणून यापूर्वी 2 डिसेंबर रोजी नगरपालिका व नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या होत्या.

या टप्प्यात 27 महापालिकांची मुदत आधीच संपली असून, नव्याने स्थापन झालेल्या जालना आणि इचलकरंजी या दोन महापालिकांचाही निवडणूक कार्यक्रम यात समाविष्ट आहे. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे. ही यादी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्याने त्यात बदल करण्याचा अधिकार राज्य निवडणूक आयोगाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • नामनिर्देशन पत्र स्वीकारणे – 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  • अर्जाची छाननी – 31 डिसेंबर
  • उमेदवारी माघारीची मुदत – 2 जानेवारी
  • चिन्ह वाटप आणि अंतिम उमेदवार यादी – 3 जानेवारी
  • मतदान – 15 जानेवारी
  • निकाल – 16 जानेवारी

📊 निवडणूक आकडेवारी

  • एकूण मतदार: 3.48 कोटी
  • एकूण मतदान केंद्रे: 39,147
  • मुंबईतील मतदान केंद्रे: 10,111
  • कंट्रोल युनिट्स: 11,349
  • बॅलेट युनिट्स: 22,000

महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे सध्या जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नाही, त्यांनी निवडणूक निकालानंतर सहा महिन्यांच्या आत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहणार आहे.