नाशिक शहरात नायलॉन मांजाची साठवणूक, विक्री व वापर यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी दिले होते. त्यानुसार गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ ने प्रभावी कारवाई करत बंदी असलेल्या नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका तरुणास अटक केली आहे.
दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हेशाखा युनिट २ मधील अधिकारी नायलॉन मांजाच्या अवैध विक्रीबाबत माहिती संकलन करत असताना सुर्यसुंदर सोसायटी, जगताप मळा, उपनगर, नाशिक येथे एका बंद फ्लॅटसमोर नायलॉन मांजाची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीनुसार, यश मनोहर काळे (वय १९) हा प्लास्टिक गोणीमध्ये मोनोफिल गोल्ड कंपनीचा नायलॉन मांजा विक्रीसाठी ठेवत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.
कारवाईदरम्यान ६६ गट्टू (बॉबीन) आणि ७ प्लास्टिक चक्री असा एकूण ७०,९०० रुपयांचा नायलॉन मांजाचा साठा जप्त करण्यात आला. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनगर पोलीस ठाणे करीत आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त, उप आयुक्त (गुन्हे) व सहा. पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.