नाशिक जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक रोमांचक आणि प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, भारतीय हवाई दलाच्या प्रसिद्ध सूर्यकिरण ऍरोबॅटिक टीमकडून गंगापूर धरण परिसरात भव्य एअर शो सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम नाशिक पर्यटन महोत्सवाचा एक महत्त्वाचा भाग असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
हा एअर शो २३ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात येणार असून, सुमारे ३३ हजार प्रेक्षक एकाच वेळी हा शो पाहू शकतील अशी व्यवस्था प्रशासनाने केली आहे. या शोच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाचे वैमानिक आकाशात विविध साहसी आणि कलात्मक कसरती सादर करत देशभक्तीची भावना जागृत करणार आहेत.
या कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत, जिल्हा नियोजन अधिकारी शिंदे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, नाशिक हा देशसेवेत मोठ्या प्रमाणावर युवक देणारा जिल्हा आहे आणि येथे देशभक्तीची भावना दृढ आहे. त्यामुळेच महाराष्ट्र शासनाने नाशिकमध्ये हा एअर शो घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी प्रवेश मार्गांनुसार स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभाग विशेष नियोजन करीत आहेत.
हा एअर शो सूर्यकिरण पथक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पर्यटन विभाग, पाटबंधारे विभाग, जिल्हा नियोजन आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. परिसरातील स्थानिक रहिवाशांना खाद्यपदार्थ व इतर स्टॉल लावण्याची मुभा देण्यात आली असून, मात्र पक्ष्यांना आकर्षित करणारे पदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली आहे, अशी स्पष्ट सूचना प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
हा आगळावेगळा आणि थरारक अनुभव नाशिककरांना देशाच्या हवाई शक्तीचे दर्शन घडवेल आणि युवकांमध्ये देशसेवेची प्रेरणा निर्माण करेल, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.