वडाळीभोईत श्री खंडेराव महाराजांचा उत्साही यात्रोत्सव; रथ मिरवणूक, लोकनाट्य आणि कुस्त्यांची दंगल

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे ग्रामदैवत श्री खंडेराव महाराजांचा चंपाषष्ठी व स्कंध षष्ठी निमित्ताने होणारा पारंपरिक यात्रोत्सव बुधवारपासून सुरू होणार आहे. या निमित्ताने गावात भक्ती आणि उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून, यात्रोत्सव समितीने विविध आकर्षक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

समितीकडून प्राप्त माहितीनुसार, यात्रेची सुरुवात बुधवारी सकाळी ११ वाजता भव्य रथ मिरवणुकीने होईल. त्यानंतर दुपारी ४ वाजता श्री खंडेराव महाराज मंदिरासमोर लंगर तोडण्याची पारंपरिक प्रथा पार पडेल. रात्री ८ वाजता लोकप्रिय कलाकार रघुवीर खेडकर आणि कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्याचा कार्यक्रम रंगणार आहे.

यानंतर गुरुवारी (दि. २७) विविध करमणुकीचे कार्यक्रम होणार असून, रात्री ८ वाजता नितीन कुमार बनसोडे आणि मंगला बनसोडे यांच्या लोकनाट्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यात्रेतील प्रमुख आकर्षण ठरणार आहे भव्य कुस्ती दंगल, जी शुक्रवारी (दि. २८) आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभागी विजयी मल्लांना श्री खंडेराव महाराज यात्रोत्सव समितीतर्फे आकर्षक बक्षिसे प्रदान केली जाणार आहेत.

यात्रोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन आहेर, उपाध्यक्ष विजय बोराडे, कोशाध्यक्ष दशरथ जाधव, कारभारी आहेर, तसेच सरपंच नितीन आहेर यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सव यशस्वी करावा असे आवाहन केले आहे.