नाशिकच्या ओझर येथील खंडेराव महाराजांची भव्य यात्रा; पाच दिवस उत्साहाचा जल्लोष

नाशिक जिल्ह्यातील धार्मिक परंपरा व जनआस्थेचे प्रतीक असलेली खंडेराव महाराजांची सर्वांत मोठी यात्रा यंदा 26 नोव्हेंबर रोजी चंपाषष्ठीपासून ओझर येथे सुरू होत आहे. पाच दिवस चालणाऱ्या या यात्रेला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने हजेरी लावतात. ओझरची यात्रा सुरू झाल्यानंतर जिल्ह्यातील इतर यात्रांनाही टप्प्याटप्प्याने सुरुवात होते.

मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्गाला समांतर असलेल्या बाणगंगा नदीवरील पुलाजवळ ही भव्य यात्रा भरते. यात्रेच्या पहिल्या दिवसाचे प्रमुख आकर्षण असते बारागाडे. पंचक्रोशीतील बारा वाड्यांतील देवगाड्यांचा समावेश या मिरवणुकीत होतो. सर्वप्रथम देवाचा गाडा आणि त्यानंतर वस्ती, वाड्यांचे गाडे मिरवणुकीत सहभागी होतात.

दैवसेवा करणाऱ्यांमध्ये भगत, चोपदार, घोडेवाले, पालखीवाले, चौरीवाले, ढालवाले, काठीवाले, भोई, हरदास, शिंगवाले तसेच वाघोजी यांचा समावेश असतो. मिरवणुकीत मल्ल कसरतीचे प्रात्यक्षिक भाविकांचे लक्ष वेधून घेतात. यात्रेआधी खंडेराव महाराजांच्या चांदीच्या मुकुटाची पालखीमानाच्या घोड्याची सवाद्य मिरवणूक काढली जाते.

भाविकांच्या जयघोषात ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ आणि भंडाऱ्याची उधळण करत बारागाडे ओढले जातात. हा धार्मिक उत्सव शांततेत आणि उत्साहात पार पडावा, असे आवाहन ओझर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरण देशमुख, पोलीस निरीक्षक समीर केदार तसेच यात्रा समितीने केले आहे।