फेक ट्रॅफिक ई-चलान मेसेजपासून सावध! नागरिकांसाठी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन; लोक अदालतीत दंड भरण्याची संधी

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली नागरिकांना बनावट ट्रॅफिक ई-चलान संदेश पाठवून ऑनलाइन फसवणूक करण्याचे प्रकार वाढत असल्याने नागरिकांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काही अज्ञात व्यक्तींमार्फत फेक ट्रॅफिक ई-चलान (Fake Traffic E-Challan) आणि दंडाच्या नावाने व्हॉट्सअॅप, एसएमएस तसेच इतर सोशल मीडिया माध्यमांद्वारे खोटे संदेश पाठविले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

या संदेशांमध्ये “तुमच्यावर वाहतूक दंड बाकी आहे, तात्काळ भरावा अन्यथा वाहन जप्त केले जाईल” अशा स्वरूपाची भीती निर्माण करणारी भाषा वापरून नागरिकांना बनावट लिंकवर क्लिक करण्यास प्रवृत्त केले जाते. अशा संशयास्पद लिंकवर क्लिक केल्यास मोबाईल हॅक होणे, बँक खात्यातील रक्कम चोरी जाणे किंवा वैयक्तिक माहिती लीक होण्याचा गंभीर धोका संभवतो.

अधिकृत ई-चलान कसे येते?

वाहतूक विभागाकडून पाठविले जाणारे ट्रॅफिक ई-चलान हे केवळ वाहनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे पाठविले जाते. व्हॉट्सअॅप, सोशल मीडिया किंवा APK फाईलद्वारे कोणतीही लिंक अथवा संदेश अधिकृतरीत्या पाठविले जात नाहीत.

नागरिकांनी ई-चलान संबंधित कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती अधिकृत आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक आहे. वाहनावरील दंडाबाबत शंका असल्यास संबंधित वाहतूक विभागाशी संपर्क साधून पडताळणी करावी.

ई-चलान भरताना केवळ अधिकृत सरकारी पोर्टलचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच OTP, बँक खात्याची माहिती, UPI PIN, डेबिट किंवा क्रेडिट कार्डची माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना

  • मोबाईलमध्ये अनोळखी APK फाईल डाउनलोड करू नका.
  • स्क्रीन शेअरिंग किंवा रिमोट अॅक्सेस अॅप्स इन्स्टॉल करण्याचे टाळा.
  • संशयास्पद मेसेज मिळाल्यास तो त्वरित डिलीट करून संबंधित नंबर ब्लॉक करा.
  • ऑनलाइन फसवणुकीचा संशय आल्यास तात्काळ १९३० सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा.
  • जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवा किंवा ऑनलाइन तक्रार दाखल करा.
  • आपल्या कुटुंबीय आणि परिचितांमध्ये अशा व्हॉट्सअॅप फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करा.

लोक अदालतीत प्रलंबित ई-चलान भरण्याची संधी

दरम्यान, नाशिक शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वाहतूक शाखा आणि विविध पोलीस ठाण्यांमार्फत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर ई-चलान प्रणालीद्वारे कारवाई केली जाते. वाहनधारकांना चलानाबाबत माहिती एसएमएसच्या माध्यमातून पाठविली जाते.

शहरातील विविध सिग्नल चौकांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही आणि अॅडव्हान्स ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमद्वारे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर स्वयंचलित पद्धतीने ई-चलान जारी केले जात आहेत. वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात ड्रायव्हिंग लायसन्स निलंबनासाठी आरटीओ विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याची कार्यवाहीही नियमित सुरू आहे.

ज्या वाहनचालकांनी अद्याप प्रलंबित दंड भरलेला नाही आणि ज्यांची प्रकरणे तडजोडीस पात्र आहेत, त्यांच्यासाठी लोक अदालतीत दंड भरण्याची विशेष संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संबंधित वाहनधारकांना मोटार वाहन न्यायालय, नाशिकरोड येथे आयोजित लोक अदालतीत उपस्थित राहून दंड भरता येणार आहे.

दंड भरण्यासाठी UPI QR कोड, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा रोख रकमेचा पर्याय उपलब्ध राहणार असून, न्यायालय परिसरात उपस्थित वाहतूक अंमलदारांकडील ई-चलान मशीनद्वारे भरणा करता येईल.

वाहतूक विभागाने नागरिकांना फसव्या ई-चलान संदेशांपासून सावध राहण्याचे तसेच पात्र प्रकरणांमध्ये लोक अदालतीचा लाभ घेऊन प्रलंबित दंड निकाली काढण्याचे आवाहन केले आहे.