नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गोदावरीवर ४ नवीन घाट; २६७ कोटींच्या कामांना मंजुरी

प्रयागराज कुंभमेळ्याच्या धर्तीवर नाशिक येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक भव्य आणि सुव्यवस्थित करण्यासाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गोदावरी नदीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात चार नवीन घाट उभारण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पासाठी एकूण २६७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून ७० कोटी रुपये, त्र्यंबकेश्वर येथील सलग दोन किलोमीटर घाटांसाठी १७७ कोटी रुपये आणि इतर घाटांसाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

सध्या रामकुंड आणि त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड या अमृतस्नानाच्या मुख्य जागा तुलनेने लहान असल्याने मोठ्या प्रमाणावर भाविक एकाच वेळी स्नान करू शकत नाहीत. त्यामुळेच नवीन घाटांची निर्मिती करून एकाच वेळी अधिक भाविकांना स्नानाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक येथे लक्ष्मीनारायण घाट, गंगापूर धबधबा घाट, नवशा गणपती घाट आणि ओढा परिसरात घाट उभारले जाणार आहेत. तर त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीवर जव्हार फाटा ते प्रयागतीर्थ दरम्यान सलग घाट विकसित करण्यात येणार आहेत.

या नव्या व्यवस्थेमुळे छत्रपती संभाजीनगर, नाशिकरोड आणि तपोवन मार्गे येणाऱ्या भाविकांना लक्ष्मीनारायण घाटाचा उपयोग करता येणार आहे. तसेच गुजरातकडून हरसूल मार्गे येणाऱ्या भाविकांसाठी गंगापूर धबधबा घाट आणि नवशा गणपती घाट उपयुक्त ठरणार आहेत.

ओढा रेल्वेस्थानक परिसरात पर्वणी काळात दररोज किमान २० रेल्वेगाड्या थांबवण्याची सोय करण्यात येणार असून त्यामुळे भाविकांची वाहतूक अधिक सुलभ होणार आहे.

सिंहस्थ कुंभमेळा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर अशा दोन ठिकाणी विभागलेला असतो. त्र्यंबकेश्वर येथे शैव संप्रदायाचे १० आखाडे अमृतस्नान करतात, तर नाशिक येथे वैष्णव संप्रदायाचे ३ आखाडे स्नान करतात. ही धार्मिक परंपरा जपून भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी ही नवीन पायाभूत सुविधा उभारली जात आहे.

या निर्णयामुळे सिंहस्थ कुंभमेळा अधिक सुरक्षित, सुव्यवस्थित आणि भाविकांसाठी सोयीस्कर होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे. लाखो भाविक एकाच वेळी स्नान करू शकतील अशी व्यवस्था उभी राहिल्याने नाशिकचा सिंहस्थ कुंभमेळा देशातील सर्वात नियोजनबद्ध धार्मिक सोहळ्यांपैकी एक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.