महापालिका निवडणुकीपूर्वीच इच्छुक उमेदवारांचा प्रचार सुरू, शहरात राजकीय हालचालींना वेग

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापताना दिसत आहे. अधिकृत उमेदवारीची घोषणा अद्याप झालेली नसतानाही विविध राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवारांनी थेट प्रचाराला सुरुवात केल्याचे चित्र शहरातील अनेक प्रभागांमध्ये पाहायला मिळत आहे.

सध्या पक्षांतर्गत मुलाखती, वरिष्ठ नेत्यांच्या बैठका, तसेच सर्वेक्षण अहवालांच्या आधारे उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू असली, तरी काही इच्छुकांनी मात्र औपचारिक घोषणांची वाट न पाहता प्रचाराचा नारळ फोडल्याचे स्पष्ट होत आहे. काँग्रेस, भाजप, दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी, मनसे तसेच इतर पक्षांचे इच्छुक उमेदवार आपल्या-आपल्या प्रभागांमध्ये घरोघरी भेटी देत आहेत. मतदारांशी थेट संवाद, प्रचार पत्रकांचे वाटप आणि सोशल मीडियावर सक्रिय उपस्थिती अशा माध्यमातून प्रचाराला वेग दिला जात आहे.

विशेष बाब म्हणजे काही ठिकाणी प्रचार पत्रकांवर संबंधित पक्षाचे अधिकृत चिन्ह तसेच प्रमुख नेत्यांचे फोटो झळकत असल्याने, त्या इच्छुकांची उमेदवारी अधिकृत झाली की काय, अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू झाली आहे. अधिकृत घोषणा नसतानाही सुरू असलेल्या या आक्रमक प्रचारामुळे काही पक्षांमध्ये अंतर्गत नाराजीचे सूरही उमटू लागले आहेत.

एकाच प्रभागात एकाच पक्षाचे दोन किंवा अधिक इच्छुक प्रचार करत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही भागांमध्ये तर एकाच दिवशी वेगवेगळ्या इच्छुकांची प्रचार साहित्ये घरोघरी पोहोचत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे पक्ष संघटनांपुढेही आव्हान उभे राहिले आहे.

दरम्यान, पक्ष पातळीवर उमेदवार निवडीसाठी औपचारिक प्रक्रिया सुरू असली तरी काही इच्छुकांनी “आधी प्रचार, मग तिकीट” अशी रणनीती स्वीकारल्याचे दिसून येते. प्रचाराच्या या धडाक्यामुळे राजकीय वातावरण तापले असले, तरी प्रत्यक्षात उमेदवारी कुणाला मिळणार, याबाबत अद्यापही अनिश्चितताच कायम आहे.