नाशिकमध्ये फर्जी लोन कॉल सेंटरवर सायबर पोलीसांची धडक कारवाई; एक जेरबंद, एक फरार

नाशिक शहरातील फर्जी लोन कॉल सेंटर फसवणूक प्रकरणात सायबर पोलीस स्टेशनने मोठी कारवाई करत एक आरोपीला जेरबंद केले आहे. किरण माळी यांनी नाशिक शहराच्या मा. पोलिस आयुक्तांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर तक्रार केली होती की स्वस्तिक फिनसर्व्ह नावाने नाशिक रोड परिसरात काम करणाऱ्या व्यक्तींनी 18,000 रुपये घेऊनही त्यांना कोणतेही कर्ज मंजूर केले नाही.

तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे व त्यांच्या पथकाने सखोल तांत्रिक तपास केला. संबंधित ठिकाण शिकरेवाडी, पासपोर्ट ऑफिसजवळ, रजनीपार्क अपार्टमेंट येथे पवन महादु निकम व प्रीती उर्फ मयुरी अरुण चौरसिया स्वस्तिक फिनसर्व्ह नावाने ऑफिस चालवित असल्याचे स्पष्ट झाले.

छाप्यात सात रकाने असलेले रजिस्टर, सहा फाईल्स, 33 कस्टमर फॉर्म, दोन रिसीप्ट बुक, पाच बॉक्स व्हिजिटिंग कार्ड्स, 94 सिमकार्ड, 58 रिकाम्या सिम पाकिटांसह एक लॅपटॉप, तीन मोबाईल फोन, विविध बँकांचे 34 चेक तसेच एकूण सुमारे 80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तपासात उघड झाले की आरोपींनी कॉल सेंटर पद्धतीने महिलांना नोकरीवर ठेवले होते आणि गरजूंना विविध वित्तीय संस्थांकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. मात्र कोणालाही कर्ज मंजूर न करता 13 नागरिकांची तब्बल 7,72,500 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

सायबर पोलीस स्टेशन, नाशिक शहर येथे 10 डिसेंबर 2025 रोजी IPC कलम 318(4), 3(5) व माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66(D) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पवन महादु निकम याला अटक करण्यात आली असून प्रीती उर्फ मयुरी चौरसिया फरार आहे.

सायबर पोलीसांचे म्हणणे आहे की या गुन्ह्यात अजूनही अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारे स्वस्तिक फिनसर्व्ह नावाने कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने कोणी फसवणूक केली असल्यास त्यांनी त्वरित नाशिक सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.