स्ट्राँगरूमवर वॉच: राजाभाऊ वाजेंचे पत्र; जिल्हाधिकाऱ्यांची मान्यता

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळ गोदामातील स्ट्राँगरूमवर वॉच ठेवण्यासाठी प्रतिनिधी नियुक्त केले आहेत. संबंधित प्रतिनिधींच्या नियुक्तीला जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी मान्यता दिली आहे.

राज्यात लोकसभेच्या पाचही टप्प्यांतील मतदान पूर्ण झाले आहे. ४८ मतदारसंघांतील ईव्हीएम हे सध्या त्या-त्या मतदारसंघांत उभारण्यात आलेल्या स्ट्राँगरूममध्ये सील करण्यात आलेले आहेत. त्या भोवती सीआरपीएफचे जवान व पोलिसांचा खडा पहारा आहे. दि. 4 जून रोजी मतमोजणीला या रूम उघडल्या जातील. परंतु बारामती मतदारसंघातील स्ट्राँगरूमचे सीसीटीव्ही तासभर बंद असल्याची तक्रार खा. सुप्रिया सुळे यांनी आयोगाकडे केली, तर नगर मतदारसंघाच्या स्ट्राँगरूममध्ये व्यक्ती आढळल्याचा आरोप आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांनी केला. त्यासंदर्भातील व्हिडिओदेखील लंके यांनी जारी केल्यामुळे एकच खळबळ उडाली. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे अलर्ट झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाने दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देत स्ट्राँगरूमची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी केली होती, तर वाजे यांनी थेट स्ट्राँगरूम परिसरात आपले प्रतिनिधी नेमण्यासंदर्भात जिल्हाधिकारी शर्मा यांना निवेदन दिले होते. त्यानुसार वाजे यांनी प्राधिकृत केलेल्या १३ प्रतिनिधींच्या नेमणुकीला शर्मा यांनी परवानगी दिली असून, दि. ४ जूनपर्यंत हे प्रतिनिधी तेथे तळ ठोकून असतील. हे प्रतिनिधी सकाळी ७ ते दुपारी ३, दुपारी ३ ते रात्री ९ व रात्री ९ ते सकाळी ७ अशा तीन शिफ्टमध्ये गोदाम परिसरातील सीसीटीव्ही रूम व नियंत्रण कक्षात उपस्थित राहतील.

अन्य प्रस्ताव नाही

अंबडच्या गोदामात नाशिक व दिंडोरी ईव्हीएम जतन केले आहेत. दोन्ही मतदारसंघांसाठी स्वतंत्र स्ट्राँगरूम असून तेथे बंदोबस्त तैनात आहे. मात्र, नाशिक मतदारसंघातील वाजे वगळता अन्य ३० उमेदवार तसेच दिंडोरीच्या 10 उमेदवारांपैकी एकानेही प्रतिनिधी नेमण्याबाबत प्रस्ताव दिला नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा: