शिक्षक निवडणुकीमध्ये मत कसे नोंदवाल..? घ्या जाणून

शिक्षक निवडणूक pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा– महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या द्विवार्षिंक निवडणुकीसाठी बुधवार, 26 जून रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत मतदारांनी आपले मत कसे नोंदवावे, याबाबतची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे.

असे नोंदवाल मत….

  • मत नोंदविण्यासाठी आपल्याला मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या स्केच पेनचाच वापर करावा. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉलपॉइंट पेन वापरू नका.
  • आपण निवडलेल्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावापुढील ‘पसंतीक्रम नोंदवा’ या रकान्यात ‘१’हा अंक लिहून मत नोंदवा.
  • एकापेक्षा अधिक उमेदवार निवडून द्यायचे असले तरी ‘१’ हा क्रमांक एकाच उमेदवाराच्या नावापुढे नोंदवावा.
  • निवडून देण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या कितीही असली तरी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या संख्येइतके पसंतीक्रमांक आपणांस उपलब्ध आहेत.
  • उरलेल्या उमेदवारांकरिता आपल्या पसंतीक्रमानुसार पुढील पसंतीक्रमांक अनुक्रमे २, ३, ४, इ. नोंदवावेत.
  • कोणत्याही उमेदवाराच्या नावापुढे केवळ एकच अंक नोंदवा. एकच अंक एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावापुढे नोंदवू नका.
  • पसंतीक्रम केवळ अंकांमध्येच नोंदवावेत, जसे की,-१, २, ३, इ. पसंतीक्रम एक, दोन, तीन, इ. असे अक्षरी नोंदवू नका.
  • अंकांच्या आंतरराष्ट्रीय लिपीमध्ये, जसे की,- 1, 2, 3, 4, इ. किंवा रोमन लिपीमध्ये, जसे की,- I, II, III, इ. किंवा देवनागरी लिपीमध्ये जसे की १, २, ३, ४, इ. पसंतीक्रमांक नोंदविता येतील. कोणत्याही एकाच लिपीमध्ये सर्व पसंतीक्रम नमूद करावेत.
  • मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका, आद्याक्षरे लिहू नका, आपले नाव लिहू नका किंवा कोणताही शब्द लिहू नका. तसेच, मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नका.
  • तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी ‘✔️’ किंवा ‘✖️’ अशा खुणा करू नका. अशा खुणा केलेल्या मतपत्रिका अवैध होतील.
  • तुमची मतपत्रिका वैध ठरण्याकरिता तुमचा पहिला पसंतीक्रम कोणत्याही एका उमेदवाराच्या नावापुढे ‘१’ हा अंक नमूद करून नोंदविणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम नोंदवणे केवळ ऐच्छिक आहे, बंधनकारक नाही.

तरी धुळे जिल्ह्यातील शिक्षक मतदारांनी नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या मतदानासाठी वरील सुचनांचे पालन करुन अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन गोयल यांनी केले आहे.