राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना नाशिकमधील टंचाईचे संकट गडद

टॅंकर,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- राज्यात मान्सून डेरेदाखल झाला असताना, नाशिक जिल्ह्यातील टंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. २०१९ नंतर जिल्ह्यात पहिल्यांदाच टँकरने ३९८ चा आकडा गाठला आहे. तब्बल सात लाख १६ हजार ५०१ लोकसंख्येची तहान टँकरच्या सहाय्याने भागविली जात आहे.

यंदा देशात मान्सूनने वेळेआधीच आगमन केले असून, महाराष्ट्राच्या काही भागातही त्याने वर्दी दिली आहे. पण त्याचवेळी नाशिकमध्ये दुष्काळाची भीषणता अधिक वाढली आहे. गावोगावी पाण्याचे स्रोत आटले असून, धरणांमधील जलसाठ्यानेही तळ गाठला आहे. हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील जनतेला वणवण करावी लागत आहे. त्यामुळे जनतेची सारी भिस्त आता टँकरवरच अवलंबून आहे.

जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण व निफाड हे तीन तालुके वगळता, उर्वरित तालुक्यांमध्ये दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सद्यस्थितीत ३६२ गावे आणि ९४१ वाड्या असे एकूण एक हजार ३०३ ठिकाणी ३९८ टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. टँकरच्या दिवसभरात ८८९ फेऱ्या होत आहेत. नांदगाव तालुक्याला दुष्काळाची सर्वाधिक झळ बसत आहे. तालुक्यातील ४०४ गावे व वाड्यांसाठी ७७ टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, दिवसभरात टँकरच्या १७२ फेऱ्या होत आहेत. नांदगावच्या खालोखाल येवल्यात ११८ ठिकाणी ५७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मालेगावी ५६, सिन्नरला ४६, तर बागलाणला ४२ टँकर सुरू आहेत. याशिवाय पाणीपुरवठ्यासाठी २१३ विहिरी प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. दुष्काळाची दाहकता लक्षात घेता, जिल्ह्यामध्ये वेळेत मान्सून दाखल व्हावा, यासाठी प्रार्थना केली जात आहे.

वर्षभर टँकर सुरू

जिल्ह्याच्या काही भागांत गेल्यावर्षी उन्हाळ्यात सुरू झालेला टँकरफेरा अद्यापही कायम आहे. एप्रिल व मे महिन्यांत झपाट्याने टँकरच्या संख्येत वाढ होत जाऊन, ते ३९८ वर पोहोचले आहेत. यापूर्वी २०१९ ला वर्षभर टँकर सुरू होते. तेव्हाची टँकरची उच्चांकी संख्या ३९८ होती. यंदा दुष्काळाची स्थिती बघता २०१९ मधील टँकरचा उच्चांक मागे पडण्याची शक्यता आहे.

टँकरची स्थिती

तालुका- गावे- संख्या

नांदगाव- ४०४- ७७

येवला- ११८-५७

मालेगाव- १३२-५६

सिन्नर-२८०-४६

बागलाण-४९-४२

देवळा-६०-३२

चांदवड-१२६-३३

सुरगाणा-४२-१८

पेठ-३१-१६

इगतपुरी-३१-१६

त्र्यंबकेश्वर-०४-०४

नाशिक-०१-०१

एकूण- १३०३-३९८

हेही वाचा