Site icon

प्रशासकीय यंत्रणेला तत्काळ पंचनामे करण्याचे खासदार भगरेंचे आदेश

देवळा (नाशिक) : पुढारी वृत्तसेवा –  उमराणे येथे रविवारी (दि.९) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जीवित व वित्त हानी झालेल्या घटनास्थळी खासदार भास्कर भगरे यांनी भेट देऊन प्रशासकीय यंत्रणेला सर्व पंचनामे तत्काळ करण्याचे आदेश दिले आहेत.

देवळा तालुक्यातील उमराणे व परिसरात रविवारी (दि.९) रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याच्या पावसामुळे तिसगाव येथील एका वीस वर्षीय तरुणावर वीज पडून त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर उमराणे येथे कांदा शेड कोसळून एका चाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू मृत्यू झाला आहे. तसेच वीज पडून एक बैल ठार झाल्याने पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच वाऱ्यामुळे बहुतांश कांद्याचे शेड कोसळले असून ,कांदा भिजून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.

देवळा : उमराणे येथे नुकसान झालेल्या कांद्याची पाहणी करताना खासदार भास्कर भगरे ,माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल समवेत व्यापारी आदी.

घटनास्थळी आज सोमवारी (दि.१०) रोजी दिंडोरीचे नवनिर्वाचित खासदार भास्कर भगरे, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल, तहसीलदार मिलिंद कुलकर्णी आदींनी भेट दिली. तसेच झालेल्या नुकसानीची पाहणी करून तहसीलदारांना त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वीज कोसळून मृत्यु मुखी पडलेल्या तिसगाव येथील आकाश देवरे (वय २०) व उमराणे येथील कांदा शेड कोसळून देवीदास भाऊराव आहेर (वय 40) यांच्या घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले. त्याच बरोबर पालकमंत्री बबनराव दादा भुसे, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी देखील नुकसानग्रस्त भागास भेट देऊन आपदग्रस्त नागरिकांची भेट घेऊन त्यांना दिलासा दिला आहे. यावेळी राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

Exit mobile version