Site icon

पशुधन वाचविण्यासाठी पशुमालकावर पदरमोड करण्याची वेळ 

मखमलाबाद (नाशिक) : नेमीनाथ जाधव

यंदा उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने पाळीव प्राणी विशेषत: दूध देणाऱ्या जनावरांचे संगोपन करण्यात चाऱ्याअभावी अडचणी येत आहेत. चाऱ्याचे भाव गगनाला भिडल्याने बळीराजा तसेच गोठेमालकांपुढे मोठा प्रश्न उभा ठाकला आहे. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्यासह अन्य चाऱ्याच्या दरात टनाला आठशे ते बाराशे रुपयांनी वाढ झाली आहे. अनेक हतबल शेतकऱ्यांना आपले पशुधन बाजारात विक्रीसाठी आणावे लागत असून, मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

पशुपालकांपुढे आव्हाने

आधीच पाणीटंचाई, त्यात आता चाऱ्याचीही टंचाई शेतकरी तसेच पशुपालकांपुढे आव्हाने उभी करणारी आहे. बरेचसे शेतकरी आपले दुभते पशुधन बुधवारच्या बाजारात विक्रीसाठी आणत असून, या ठिकाणीही अपेक्षित भाव न मिळाल्याने तसेच खरेदी करणाऱ्यास अन्य शेतकरी तयार नसल्याने अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजच्या घडीला बाजारात विक्रीस येणाऱ्या गाई-म्हशींची संख्या बैलांपेक्षा अधिक आहे. चाऱ्याचा दर गगनाला भिडल्यामुळे बरेचसे शेतकरी पशुपालनास धजावत नसल्याचे सांगतात.

सद्यस्थिती पाहता बरेचसे शेतकरी हे आधुनिक पद्धतीने शेतीकडे वळले आहेत. या आधुनिक शेतीमुळे ट्रॅक्टर, हार्वेस्टर व अन्य साधनसामग्रीमुळे शेतकऱ्यांना पशुधनाची फारशी गरज भासत नाही. नांगरणी, वखरणी तसेच लागवडीसाठी ट्रॅक्टरचाच अधिक वापर केला जात आहे. त्यामुळे अनेक शेतकरी आपले पशुधन विकत असल्याचे वास्तव बाजारपेठेत आल्यावर स्पष्टपणे जाणवते.

दुधाचा व्यवसायही अडचणीत

उन्हामुळे हिरवा चारा अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने त्याचा भावही अधिक आहे. तो विकत घेणे अनेकांना शक्य नाही. जनावरांचा चाऱ्यांचा भाव वाढल्याने दुग्धव्यवसायावर परिणाम होत असून, सध्या दुधाचा भाव गाईचे दूध ५६ रुपये लिटर, तर म्हशीचे ८० रुपये प्रतिलिटर विक्री केली जात आहे. हा व्यवसायही अडचणीत आला आहे.

असा आहे चाऱ्याचा भाव

मुरघासही महागला

पावसाळ्यासाठी मुरघास (मक्याचे बारीक कुट्टी व मीठ टाकून बंदिस्त केले जाते) याचा भाव ५ हजार रुपये टन आहे. या वधारलेल्या दरामुळे आता शेतकरीराजाला आपल्या पशुधनाचे संवर्धन करण्यात मोठी कसरत करावी लागत आहे.

जनावरांना हिरवा चारा तसेच कुट्टी द्यावी लागते. दूध-दुभत्या जनावरांना वेळेवर चारा देणे आवश्यक असते. वेळेवर त्यांना चारा न मिळाल्यास दुधावर परिणाम होतो. चाऱ्याच्या भाववाढीमुळे दूध विकणे परवडत नाही. – वामन शिरसाठ, दुग्धव्यावसायिक, मखमलाबाद.

हेही वाचा:

Exit mobile version