नाशिकरांवर जलसंकट; जिल्ह्यात केवळ ८.९३ टक्के जलसाठा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्ह्यातील लहान – मोठ्या प्रकल्पांमधील जलपातळी झपाट्याने कमी हाेत पाणीसंकट दिवसेंदिवस गंभीर होत चालले आहे. जिल्ह्यातील २४ धरणांची पाणीपातळी जोत्याखाली गेली असून, सात धरण कोरडीठाक पडली आहेत. त्यामुळे सर्वांच्या नजरा मान्सूनकडे लागल्या आहेत. वेळेत वरुणराजाची कृपा झाल्यास हे जलसंकट टळण्यास मदत होणार आहे.

सलग दोन – तीन वर्षांच्या आबादाणीला गेल्या वर्षी ब्रेक लागला. घटलेले पर्जन्यमान अन‌् कडक उन्हाळ्यामुळे यंदा तीव्र पाणीटंचाईने आव्हान उभे केले. कूपनलिका व विहिरींनी तळ गाठल्याने गावागावांत फेब्रुवारीपासूनच पाण्याचे टॅंकर धावू लागले. एप्रिलपासून उन्हाच्या तडाख्याने उचल खाल्ली तशी ग्रामीण भागाच्या घशाला कोरड लागली. पशुधनाला चारा आणि ग्रामस्थांना पाणी उपलब्ध करून देताना प्रशासनाची धावपळ उडत आहे. मेअखेरच जिल्ह्यातील टँकरची संख्या ४०० वर पोहोचली असून, आठ लाखांवर लोकसंख्या या पाण्यावर अवलंबून आहे. त्यात आता प्रकल्पांनीही तळ गाठण्यास सुरुवात केल्याने समाधानकारक पर्जन्यवृष्टीपर्यंत उपलब्ध पाणी टिकविण्याचे अन‌् त्याच्या नियोजनाचे आव्हान प्रशासनासमोर राहणार आहे.

१७ प्रकल्पांत केवळ ५,८६२ दलघफू साठा

नाशिक जिल्ह्यात मध्यम व मोठे असे २४ प्रकल्प (धरण) आहेत. त्यांची एकूण जलसाठवण क्षमता ६५ हजार ६६४ दलघफू एवढी असली तरी आजघडीला त्यातील सात धरणे कोरडी झाली आहेत. उर्वरित १७ प्रकल्पात जेमतेम पाच हजार ८६२ दलघफू जलसाठा असला तरी त्यातील सर्वाधिक पाणी हे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणात (२,२९५ दलघफू) आहे. मात्र त्याचा फायदा केवळ मालेगाव शहर, नांदगाव तालुक्यातील योजना सोडल्या, तर जळगाव जिल्ह्यालाच अधिक आहे. हे पाणीवजा केल्यास जिल्ह्यात केवळ ३,५६७ दलघफू एवढाच जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ५ जूनपर्यंत हाच जलसाठा १२ हजार ५६३ दलघफू एवढा होता. त्यावरून दुष्काळी परिस्थिती अधोरेखित होते.

ही धरणे कोरडीठाक

ओझरखेड, पुणेगाव, तिसगाव, भावली, वालदेवी, भोजापूर, नागासाक्या, माणिकपुंज या धरणांनी तळ गाठला असून, यासोबतच आळंदी (१.७२ टक्के), करंजवण (२.१४ टक्के), वाघाड (३.२६ टक्के), केळझर (0.५२), पुनद (0.२३ टक्के) या प्रकल्पांतील जलसाठाही अखेरची घटका मोजतोय.

नाशिककरांना धास्ती

नाशिक शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहात केवळ १८.८९ टक्के (१९२० दलघफू) इतका जलसाठा शिल्लक आहे. मध्यंतरी दुरुस्तीच्या निमित्ताने अघोषित पाणीकपात राबवली गेली. सध्यातरी नियमित पाणी येत असले तरी पावसाळा लांबल्यास एक-दोन दिवसांआड पाणीपुरवठ्याशिवाय गत्यंतर राहणार नाही. या विचाराने ही नाशिककर धास्तावले आहेत.

हेही वाचा: